कोल्हापूर : ‘आयआरबी’ने रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत सोडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, ही अर्धवट कामे पूर्ण करण्याची जबाबदारी कोणाची ? असा संतप्त सवाल शनिवारी स्थायी समिती सभेत उपस्थित झाला. जर आयआरबी अपूर्ण कामे करणार नसेल, तर महानगरपालिका किंवा शासनाच्या निधीतून पूर्ण करावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सचिन चव्हाण होते. ‘आयआरबी’ने करायचा जावळाचा गणपती मंदिर ते क्रशर चौक हा रस्ता गेल्या पाच वर्षांपासून रखडलेला आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतही त्यामुळे व्यत्यय येत असल्याची बाब शारंगधर देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली. अपूर्ण कामे केली जाणार नसतील, तर महापालिका किंवा शासनाच्या निधीतून ती करण्यात यावीत, असेही त्यांनी सुचविले. व्हीनस चौकात अशीच ‘आयआरबी’च्या रस्त्यावर चेंबर उखडली आहेत. तेथे अपघात होण्याची शक्यता आहे, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. रंकाळा परिसरातील रस्ता करायचा झाला, तर किमान अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे स्टिअरिंग कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून आयआरबीकडून तसे पत्र घेऊ, असे नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.लक्ष्मीपुरीत झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर शहरातील चारही विभागीय कार्यालयांना त्यांच्या भागातील रस्ते दुभाजक रंगविण्याचे तसेच रस्त्यांवरील चेंबर तपासण्याचे आदेश देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
‘आयआरबी’चे अपूर्ण रस्ते करायचे कोणी ?
By admin | Updated: August 3, 2014 23:37 IST