कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून कोल्हापूरच्या इतिहासात कुणी केले नाही इतके विकासकाम झाले असल्याने त्यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीबद्दल बोलण्याचा संजय पवार यांना नैतिक अधिकार काय, अशी विचारणा भाजपचे संघटन मंत्री अशोक देसाई यांनी सोमवारी केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्षपद तुम्हाला कुणामुळे मिळाले हे विसरलात का, अशीही विचारणा देसाई यांनी केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात देसाई म्हणतात, विकासाच्या मुद्द्यावर टीका करणारे संजय पवार भाजपची सत्ता असताना किती वेळा चंद्रकांतदादांकडे यायचे? त्यांना कोणामुळे महामंडळ उपाध्यक्षपद मिळाले? संजय पवार यांचे कार्यालय कोणामुळे पूर्ण झाले? याची माहिती आरोप करणाऱ्यांनी घ्यावी. दरमहिन्याला चंद्रकांतदादांच्या घरावर फेऱ्या मारणाऱ्यांनी आता असे बोलणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा होय’ असा टोलाही पत्रकात लगावला आहे. समोरचा ज्या भाषेत बोलेल त्याच भाषेत उत्तर द्यायला भाजपचा कार्यकर्ता नेहमीच तयार असतो, असाही इशारा पत्रकात दिला आहे.
कोल्हापूरच्या मानगुटीवर बसलेला बहुचर्चित टोल, विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे स्टेशन, पोलीस प्रशासनासाठी, कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी त्याचबरोबर जुन्या तालीम संस्था नूतनीकरण व त्यांच्या पुनर्बांधणीसाठी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सढळ हाताने मदत केली. गोरगरीब, वृद्ध व अनाथ लहान मुलांच्या आरोग्यासाठी तसेच शेकडो ऑपरेशनसाठी त्यांनी ‘कुणाच्या’ खिशात हात घातला नाही. अनेक खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर चमकायला हवी ती मदत केली. महापूर असो वा कोरोनाकाळात मोफत घरपोच जेवण योजनेच्या माध्यमातून गरजूंना आधार दिला.