अधीक्षक बलकवडे म्हणाले, ग्रामपंचायत निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी विवीध पातळीवर दक्षता घेतली जात आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत नव्याने उदयास आलेल्या दादा, भाई, भाऊं यांच्याकडून गोधळ घालण्याची शक्यता असल्यास त्यांच्या गोपनीय पद्धतीने कुंडली तयार करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यांच्यावर पोलिसांची विशेष नजर असेल, आवश्यकता वाटल्यास त्यांच्यावर तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील पावणेआठ हजार शस्त्र परवानाधारकांपैकी अकराशे परवानाधारकांना शस्त्रे तात्पुरती जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यापैकी ५५० जमा झाली आहेत.
नगर, नागपूरचे दुचाकी चोर कोल्हापुरात
नगर आणि नागपुरातील दुचाकी चोर कोल्हापुरात येत असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. त्या टोळ्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक लक्ष ठेवून आहे, दुचाकी चोरांचा लवकरच पर्दाफाश होईल, असेही अधीक्षक बलकवडे म्हणाले.
९३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
इचलकरंजीतील दोन टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई झाली आहे. यंदा हाणामारीतील सुमारे ९३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार आहे. २०१५ च्या निवडणुकीत २८ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील संशयितांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
‘कळंबा’प्रकरणी लवकरच पर्दाफाश
कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल पोहोच केल्यासंदर्भातील संशयितांची माहिती तसेच महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि जुना राजवाडा पोलिसांकडून याचा लवकरच पर्दाफाश होणार असल्याचा विश्वास अधीक्षक बलकवडे यांनी व्यक्त केला.