इचलकरंजी : नगरपालिका आणि शहराच्या राजकीय स्थित्यंतराचे पडसाद आता शहरातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सभांतूनही उमटू लागले आहेत. एका सहकारी बॅँकेच्या सभेत माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी कॉँग्रेस सत्तेवर असताना आणि आता भाजपच्या सत्तेदरम्यान तुलना करीत आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता यंत्रमाग वीज दराची सवलत मिळत नसल्याची टीका केली.इचलकरंजी व परिसरातील ग्रामीण परिसराचे अर्थकारण वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. यंत्रमाग उद्योगासाठी लागणारी वीज अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात महाग आहे. त्यामुळे आपल्या राज्यात तयार होणारे यंत्रमाग कापड चढ्याभावाचे असल्याने यंत्रमाग उद्योजकांना नुकसान सोसावे लागते म्हणून यापूर्वीच्या शासनाने या रोजगाराभिमुख उद्योगाला गेले वीस वर्षे सवलतीचा वीज दर दिला आहे. मात्र, भाजप सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी अनुदान बंद केल्याने वीज दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. ते कमी करण्याची शिफारस आमदार हाळवणकर यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समिती अहवालात केली होती; मात्र त्याबाबत शासनाने कोणतीही हालचाल केली नाही.नुकत्याच जाहीर झालेल्या वीज दर आकारणीमध्ये यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारी झाली असली तरी वीज दर वाढून येणार, हे निश्चित झाले आहे. त्याचा धागा पकडून माजी खासदार आवाडे यांनी मर्चंटस् बॅँकेच्या वार्षिक सभेत स्वतंत्र वर्गवारी मिळाली; पण वीज दर सवलतीचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. याबरोबरच त्यांनी शहरातील अन्य समस्यांही बोलून दाखविल्या. अनपेक्षितपणे कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी सभेसाठी उपस्थित असणाऱ्यांसमोर अशा समस्या मांडल्या आणि त्या कोण सोडविणार, असा सवाल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. (प्रतिनिधी) सरकार काहीही देणार नाहीयाच सभेत बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, सरकार काहीही देणार नाही, हे गृहीत धरून उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक व जनतेने आता कामाला लागावे. अशा प्रकारे एकाच मंचावरून आवाडे पिता-पुत्रांनी ‘भाजप’वर टीका केली.
यंत्रमागांना वीज दर सवलत कधी मिळणार ?
By admin | Updated: July 13, 2015 00:33 IST