बाबासाहेब नेर्ले
गांधीनगर : सामान्य व गोरगरिबांचे आधारवड असणाऱ्या गांधीनगरच्या उपजिल्हा वसाहत रुग्णालयास सुसज्ज इमारतीची गरज आहे. दीडशे ते दोनशे बाह्य रुग्णसंख्या व ॲडमिट होणारी संख्या लक्षात घेता या रुग्णालयात सेवा देण्यासाठी मर्यादा पडत आहेत. त्यामुळे या रुग्णालयात सुसज्ज इमारतीची गरज आहे. नव्या इमारत बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे धूळखात पडला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रस्तावावर निर्णय घेऊन नव्या इमारतीस मंजुरी देणे गरजेचे आहे. गांधीनगर वसाहत रुग्णालयात वळिवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, रुकडी, गांधीनगर या गावांतील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे दररोज या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. इमारत तोकडी पडत असल्याने सध्या रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात ज्या सुविधा हव्या आहेत त्या मिळत नाहीत. परिणामी, रुग्णांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सध्याच्या जुन्या इमारतीला तडे गेले आहेत. पावसाळ्यात या इमारतीच्या छतला गळती लागते. वर्षाला गळती काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा पैसा पाण्यात जातो. रुग्णालयातील पाठीमागील रिकामी जागेत खुरट्या वनस्पती वाढल्या आहेत. इमारतीच्या सभोवतालचे कंपाैंड दुरावस्थेत आहे. त्याची काही ठिकाणी पडझड झाली आहे. रुग्णालयाची इमारत खाली व रहदारीचा रस्ता वरती झाल्याने पावसाळ्यात इमारतीभोवती तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. या रुग्णालयात एकाच ठिकाणी सर्व विभागांना जागा उपलब्ध होण्यासाठी सुसज्ज इमारतीची गरज आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
चौकट :
रुग्णालयाच्या पाठीमागील मोकळी जागा वापरात आणून त्या ठिकाणी सुसज्ज इमारत उभी करता येईल, पण तेवढी इच्छाशक्ती आरोग्य विभागाने दाखविने गरजेचे आहे. याठिकाणी रुग्णांना सर्व आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. बाह्यरुग्ण तपासण्यासाठी वेगवेगळे विभाग आहेत. पण रुग्णांच्या वाढीव संख्येमुळे ते विभाग अपुरे पडत आहे. रुग्णांना थांबविण्यासाठी जागा कमी पडत आहे. इमारतीतील शौचालये अपुरी पडत आहेत. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उपसंचालकांनी या उपजिल्हा रुग्णालयासाठी नवीन इमारतीचा प्रस्ताव मंजूर करून सुसज्ज इमारत उभी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
फोटो १२ गांधीनगर रुग्णालय : गांधीनगर वसाहत रुग्णालयाची जुनी इमारत (छाया : अनिल निगडे)