कोल्हापूर : पोलीस उद्यानातील ३०३ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरील तिरंगा कधी फडकणार, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पोलीस उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्या ठिकाणी तिरंगा फडकण्यापेक्षा जास्त दिवस उतरवला गेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. येणाऱ्या प्रजासत्ताकदिनी तरी तो फडकणार का, अशी विचारणा होत आहे.
तत्कालीन महसूलमंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी उद्योगांच्या सहभागातून कोल्हापूर पोलीस दलाच्या जागेवर केएसबीपी संस्थेचे सुजय पित्रे यांनी पोलीस उद्यान साकारले. तसेच या ठिकाणी देशातील दुसऱ्या नंबरच्या ३०३ फूट उंचीचा भारतीय तिरंगाही उभारण्यात आला. येथील उद्यानाला नागरिकांची चांगली पसंती मिळाली. परंतु नंतर मात्र हा तिरंगा फडकताना दिसण्याऐवजी उतरवलेलाच दिसू लागला. लाखो रुपयांची गुंतवणूक करून नेमके काय मिळवले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोल्हापुरात पर्यटन वाढावे, यासाठी पाटील यांनी केएसबीपीच्या माध्यमातून जे प्रयत्न केले ते दाद देण्याजोगे आहेत. मात्र, या ध्वजस्तंभावर महिनोनमहिने तिरंगा फडकत नाही, याची जबाबदारी कोण घेणार, अशी विचारणा केली जात आहे.
याबाबत दोन वर्षांपूर्वीही विचारणा करण्यात आली होती. तेव्हा देशातील सर्वांत उंच असलेला वाघा सीमेवरील तिरंगा प्रचंड वाऱ्यामुळे नेहमी उतरवून ठेवला जातो. रांची येथील ध्वजही उतरवलेला असतो. पुण्यातील ध्वजही वातावरणानुसार उतरवला जातो. मात्र, वाऱ्याच्या वेगाचा अभ्यास करून कोल्हापूरचा झेंडा नेहमी फडकत राहील याची दक्षता घेऊ, अशी ग्वाही पित्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, तरीही झेंडा फडकत नाही, हे वास्तव आहे.
चौकट
नेमकी जबाबदारी कोणाची
पोलीस उद्यानातील झेंडा फडकत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, अशी विचारणा होत आहे. जर ती जबाबदारी पोलीस दलाची असेल तर तशी कार्यवाही त्यांनी करण्याची गरज आहे. पोलीस दल ती जबाबदारी घेणार नसेल, तर ज्यांनी प्रकल्प उभारला त्या केएसबीपी संस्थेची ती जबाबदारी आहे. त्यांनी याबाबत निर्णय जाहीर करण्याची गरज आहे.
२३०१२०२१ कोल झेंडा
पोलीस उद्यानातील या ध्वजस्तंभाला आता तिरंग्याची प्रतीक्षा आहे.