कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून पहिल्याच प्रयत्नात विजयी झालेला बयाजी देवू शेळके हा धनगर समाजातील अत्यंत सामान्य कार्यकर्ता ‘जायंट किलर’ ठरला. दूध संस्थेचा सचिव ते संघाचा संचालक अशी विजयी झेप त्याने घेतली आहे. त्याने संघाचे मागील तीन टर्म संचालक असलेले विश्वास शंकर जाधव (रा. कोडोली) यांचा पराभव केला. पालकमंत्री सतेज पाटील यांनी बयाजीला पॅनेलमध्ये संधी दिली. बयाजी शेळके याला १९३९ तर जाधव यांना १६६५ मते मिळाली. बयाजी २७४ मतांनी विजयी झाला.
या गटातून विश्वास जाधव यांचे कायमच वर्चस्व राहिले. विश्वास जाधव हे मूळचे रामोशी समाजातील. कधीकाळी ट्रॅक्टरने मुरूम ओढायचे काम ते करायचे. पन्हाळा बावड्याचे तत्कालीन आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्या संपर्कात आल्यावर त्यांनी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना सांगून जाधव यांना संघाच्या पॅनेलमध्ये संधी दिली. त्यामुळे संघाच्या राजकारणात ते नरके गटाचे मानले जातात. कोडोलीच्या स्थानिक राजकारणात मात्र ते माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे काम करीत होते. अशा मातब्बर संचालकाला पराभूत करण्याची किमया शेळके यांनी करून दाखविली आहे.
बयाजी हा गगनबावडा तालुक्यातील वेसरफचा. कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा शेती हाच व्यवसाय. आईवडील दोघेही अशिक्षित. बयाजी गावातील दूध संस्थेचा सचिव होता. त्यानंतर तो राजकारणात सक्रिय झाला व पालकमंत्री पाटील यांचे नेतृत्व मानून काम करू लागला. जिल्हा युवक काँग्रेसचा तो उपाध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात तो सक्रिय आहे. त्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे मल्हार सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाच्या प्रश्नांवर सतत लढत राहिला आहे. त्यामुळे बयाजीच्या विजयासाठी या समाजातील तरुण कार्यकर्त्याची फळी गेले पंधरा दिवस पायाला पाने बांधून फिरत होती. सारा जिल्हा त्यांनी पिंजून काढला होता. त्याचाही फायदा बयाजीला झाला. या गटातून युवराज गवळी की बयाजी असा पेच पालकमंत्री पाटील यांच्यासमोर होता. त्यांनी बयाजीवर विश्वास दाखविला व तो त्याने सार्थ केला.