कोल्हापूर : गेले १९ दिवस शांततेत सुरू असलेल्या सराफ व्यावसायिकांच्या संपाला रविवारी गालबोट लागले. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाच्या पदाधिकाऱ्यांत व्यवसाय बंद ठेवण्याच्या प्रश्नावरून वादावादी, हमरी-तुमरीचा प्रसंग घडल्यामुळे गुजरी परिसरात सुमारे दोन तास वातावरण तंग बनले. या प्रश्नावरून संघाच्या पदाधिकाऱ्यांत फूट पडल्याचे दिसले. सायंकाळी होणाऱ्या बैठकीवर संघाच्या एका गटाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने बैठकच रद्द करून ती आज, सोमवारी सकाळी दहा वाजता घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अबकारी कर रद्द करावा या मागणीसाठी जिल्ह्यात सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू आहे. जिल्हा सराफ संघ तसेच सराफ व सुवर्णकार संघ अशा दोन संघटनांनी देशव्यापी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारी रात्री दिल्लीत केंद्र शासनासोबत चर्चेनंतर हा संप मागे घेण्याबाबतचे वृत्त कोल्हापुरात येऊन थडकले. त्यामुळे सराफ व्यावसायिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली. रविवारी सकाळी गुजरीत सराफांची काही दुकाने उघडली. सर्व व्यावसायिक आंदोलनस्थळी एकत्र जमले. सर्वांनी बंद ठेवण्याचा निर्णय झाला. काहींनी संप चालू ठेवण्यास नकार दिला. संप सुरू ठेवायचा असेल तर सर्वच दुकाने बंद ठेवा, अन्यथा संप मागे घ्या, असे संघाच्या पदाधिकाऱ्यांना सुनावले. त्यावरून गुजरी कॉर्नर येथे आंदोलनस्थळी पदाधिकारी व व्यावसायिकांत खडाजंगी झाली. (प्रतिनिधी)बैठकीवर बहिष्काराचा निर्णय पदाधिकारी व व्यावसायिकांत वेगवेगळे मतप्रवाह आल्याने वादाला तोंड फुटले. संघाच्या कार्यालयात सायंकाळी बैठक घेऊन निर्णय घेण्याचेही गोंधळातच सर्वानुमते ठरले. दुकाने उघडावीत असा पवित्रा काहींनी घेतल्याने सदस्य व पदाधिकाऱ्यांत वादावादी झाली. काहींनी बैठकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने सायंकाळची बैठकच रद्द केली.दोन्हीही अध्यक्षच गायबदुपारी १२ वाजता गुजरी कॉर्नर येथे संघाच्या पदाधिकारी व सदस्यांत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा व शिवीगाळ करण्याचा प्रकार नागरिकांना पाहावयास मिळाला. त्यावेळी सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल व सुरेश गायकवाड येथे उपस्थित नव्हते. वादावादीनंतर व्यावसायिकांत दोन गट रस्त्याच्या कडेला बसून होते. आंदोलनात फूटरविवारी सकाळी काही सराफ दुकाने उघडली. सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल यांनीही आपले दुकान उघडले. पदाधिकाऱ्यांनी गुजरी परिसरात रॅली काढून दुकाने बंद ठेवण्याबाबत आवाहन केले; पण त्याला ढणाल यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी, नेते रांका यांनी व्यवसाय सुरू ठेवण्यास सांगितल्याचे सांगून व्यवसाय बंद करण्यास नकार दिला. सायंकाळनंतर सुवर्णकार संघाचाही बंदशनिवारी रात्री आलेल्या सूचनेनुसार रविवारी सुवर्णकार संघाच्या सदस्यांनी सराफ बाजारपेठेत दुकाने उघडी करून व्यवसायाला प्रारंभ केला; पण सराफ संघाने याला विरोध केल्याने वातावरण तंग बनले. सायंकाळी सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल, राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत, उपाध्यक्ष केरबा खापणे, अमर गोडबोले, पांडुरंग कुंभार, सचिन देवरुखकर, आदी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. दरम्यान, सायंकाळीच पुण्यातून सुवर्णकार संघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या सूचनेवरून पुन्हा व्यवसाय आणखी दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सराफांमध्ये हमरी-तुमरी
By admin | Updated: March 21, 2016 00:38 IST