एप्रिलअखेर राज्यात दर शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊनची घोषणा राज्यशासनाने केली आहे. त्यामुळे गडहिंग्लज शहरात दर रविवारी भरणाऱ्या आठवडा बाजारावर संक्रांत आली आहे.
सीमाभागातील महत्त्वाची एक प्रमुख बाजारपेठ म्हणून गडहिंग्लजच्या पेठेची ओळख आहे. याठिकाणी जनावरांचा आठवडा बाजारही मोठ्या प्रमाणात भरतो. गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, भुदरगडसह शेजारील कर्नाटकातील निपाणी, चिक्कोडी, हुक्केरी, गोकाक, संकेश्वर व बेळगाव परिसरातील व्यापारी व शेतकरी दर आठवड्याला गडहिंग्लजच्या बाजारासाठी आवर्जून येतात.
आठवडा बाजारात भाजीपाला, फळे, कपडे, धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी आजूबाजूच्या गावातून व्यापारी व ग्राहक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे आठवडा बाजारात कोट्यवधीची उलाढाल होते.
परंतु, कोरोना लॉकडाऊनच्या नव्या नियमावलीप्रमाणे शनिवार व रविवारी शहरातील बाजारपेठ आणि रविवारी भरणारा आठवडा बाजारही बंद राहणार आहे. त्यामुळे व्यापारी, शेतकरी व ग्राहकांची मोठी कुचंबणा होणार आहे.