कोल्हापूर : राज्यात नव्याने सत्तारुढ झालेल्या भाजपच्या सरकारने टोल संस्कृतीचे समर्थनच केल्याने आयआरबी कंपनीच्या येथील टोल नाक्यांवरील कर्मचाऱ्यांची अरेरावी वाढली आहे. आतापर्यंत कोल्हापूरच्या गाडया अडविल्या जात नव्हत्या परंतू आता त्या देखील अडवून ठेवल्या जावू लागल्या आहेत. त्यामुळे नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.‘लोकमत’ ने गुरुवारी प्रमुख नाक्यांवर थांबून नेमकी वस्तूस्थिती पाहिली असता तोच अनुभव आला. टोलविरोधात रान पेटविलेल्या राज्यकर्त्यांबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोल्हापूरकरांनी वठणीवर आणले; पण या टोलमधून कोल्हापूरकरांची सुटका कधी, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. शहरात आय.आर. बी. कंपनीने ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा ’अर्थात बीओटी तत्त्वावर सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले; पण ते निकृष्ट दर्जाचा आरोप शहरवासीय करूलागले आहेत. टोल विरोधात पेटविलेले रान राज्यभर पोहोचले. याचा धसका घेत नवीन आलेल्या भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांना घालवा असा नारा देत,आमचे सरकार सत्तेवर आल्यावर राज्य टोलमुक्त करू, अशी घोषणा केली होती; परंतु भाजपने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घोषित केल्यावर फडणवीस यांनी अवघ्या काही तासांतच टोलसंस्कृती देशभर स्विकारली असून जे टोल मुदत संपल्यानंतरही वसूल केले जात आहेत असे अन्यायकारक टोल रद्द करु असे घूमजाव केले. त्यामुळे टोलचे भूत बाजूला होण्याची शक्यता धूसर बनली. परिणाम म्हणून टोलवसूलीच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)
टोलनाक्यांवर ‘वसुली’ची अरेरावी
By admin | Updated: November 14, 2014 00:45 IST