कोल्हापूर : भोगावती साखर कारखान्यातील नोकरभरतीचे पडसाद साखर कामगार समन्वय समितीत उमटले. ‘भोगावती’च्या कामगारांनी बैठकीतच साखर कामगार समन्वय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. शाब्दिक वादाचे अंगावर धावून जाण्यापर्यंत प्रकरण वाढले. अखेर पोलिसांना बोलावण्यात आल्यानंतर बैठक आटोपती घेण्यात आली. भोगावती कारखान्यात ५८० जणांची जम्बो नोकरभरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे पडसाद लक्ष्मीपुरी येथील श्रमिक हॉल येथे बुधवारी झालेल्या जिल्हा साखर कामगार समन्वय समितीच्या बैठकीत उमटले. भोगावती’च्या कामगारांनी संघटनेचे कार्याध्यक्ष राऊसो पाटील व जिल्हाध्यक्ष पंडित चव्हाण यांना चांगलेच धारेवर धरले. आम्हाला सहा महिने पगार नाही. नवीन नोकर भरती करून कारखाना संपविणार आहे का? अशी विचारणा करत या भरतीला विरोध का केला नाही? असा जाब विचारला. याबाबत संघटनेच्या प्रतिनिधींना समर्पक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे प्रतिनिधी व कामगार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. काही कामगार पदाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना बोलावून घेतले व परिस्थिती नियंत्रणात आली. यावेळी वेतनवाढीचा करार झाल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही, या मागणीसाठी २ जानेवारीला काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंडित चव्हाण, कार्याध्यक्ष राऊसाो पाटील, खजिनदार रावसाहेब भोसले, महादेव पाटील, प्रदीप बनगे, दीपक पाटील, महादेव बच्चे, संजय मोरबाळे, आदी उपस्थित होते.
साखर कामगार समन्वय समिती बैठकीत हमरी-तुमरी
By admin | Updated: December 17, 2015 01:22 IST