कोल्हापूर : अर्ध्या शहराला वळसा घालून पंचगंगा नदी बारामाही वाहत असताना शहराला पाण्याच्या टँकरची गरज भासावी यापेक्षा महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा दुसरा नमुना असेल असे वाटत नाही. त्यामुळे पाण्याचे टँकर ही प्रत्यक्षात गरज कोणाची, राजकारण्यांची-अधिकाऱ्यांची की सर्वसामान्य माणसांची, या प्रश्नाला प्रशासनाकडून जनतेला उत्तर अपेक्षित आहे.
कोल्हापूर शहराला पाण्याची भरपूर उपलब्धता आहे. अनेक भागात दिवसातील सहा-सात तास पाणीपुरवठा होतो. त्यामुळेच शहरवासीयांना पाण्याचे मूल्य समजलेले नाही. पाण्याच्या टंचाईपेक्षा पाण्याचा अतिवापर हीच एक समस्या बनली आहे. शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी येथे उपसा केंद्रे तर पुईखडी, बालिंगा व कसबा बावडा या ठिकाणी जलशुध्दीकरण केंद्रे आहेत. सरासरी दिवसाला १२० एम.एल.डी. पाणीपुरवठा होतो. मुबलक पाणी, सक्षम उपसा केंद्रे, सुस्थितीत असणारी जलशुध्दीकरण केंद्रे इतकी सारी यंत्रणा असूनही शहरात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पालिकेकडे अकरा टँकर आहेत. परंतु २०१९ व २०२१ या दोन वर्षात महापूर आल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा आठ ते वीस दिवसांपर्यंत बंद पडला होता. त्या काळात टँकर भाड्याने घ्यावे लागले.
दोन महापुराचे अनुभव लक्षात घेता उपसा यंत्रणा पुराच्या पाण्यात अडकणार नाही यावर पर्याय शोधले तर टँकर घ्यावे लागणार नाहीत. पण पर्यायांपेक्षा टँकर भाड्याने घेणे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या दृष्टीने फायद्याची गोष्ट असते. त्यातून काही ढपले पाडले जाऊ शकतात. दहा हजार लीटर क्षमतेच्या टँकरला दिवसाला १० हजार भाडे जरा जास्तच वाटते. पण तरीही ते घेतले गेले.
- शहराला लागलेले टँकर आणि खर्च -
टँकरवर झालेला खर्च - २०१९ मध्ये ४० ५२ लाख ५० हजार , २०२१ मध्ये ४५ ४३ लाख ०५ हजार ६००
पदाधिकारी प्रतिक्रिया १ -
भाड्याने टँकर घेण्यापेक्षा शहरात कूपनलिका खुदाईसाठी तरतूद केली होती, परंतु प्रशासनाकडून तो खर्च पडला नाही. जेव्हा शहराचा पाणीपुरवठा खंडित होतो तेव्हा कूपनलिका हा एक उत्तम पर्याय आहे. दोन महापुराचे अनुभव लक्षात घेता पुढील काळात तरी ठिकठिकाणी कूपनलिका मारून पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी.
- निलोफर आजरेकर, माजी महापौर
पदाधिकारी प्रतिक्रिया - २
सध्याच्या उपसा केंद्रांची उंची वाढवून ही यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी बारा कोटींचा खर्च अपेक्षित असल्याने मी सभागृहात ऐच्छिक बजेटमधून तरतूद करावी अशी सूचना केली होती. कठीण प्रसंगात टँकरने पाणी दिल्याचे प्रशासनाला फक्त समाधान मिळते, समस्या संपत नाहीत.
- अजित ठाणेकर, माजी विरोधी पक्षनेता
भाड्याने टँकर घेण्याचा विषय पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या आवडीचा विषय असतो. टँकर भाड्याने घेतले तरी सर्वसामान्यांना त्यातून पाणी मिळेलच असे सांगता येत नाही. २०१९च्या महापुरावेळी काही ठराविक नगरसेवकांनी टँकर आपल्या ताब्यातच ठेवले होते. त्याचे समान वाटप झाले नव्हते.
- सुभाष लायकर, राजाराम चौक
टँकर भाड्याने घेतले आणि त्याद्वारे पाणीपुरवठा केला तरी तो पुरेसा नसतो. ढपले पाण्यासाठी टँकर घेतले जातात का अशी शंका येते. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाने भर द्यावा. महापुरात उपसा केंद्रे पाण्यात अडकतात, त्यावरही आता पर्याय शोधले पाहिजेत.
- शशिकांत बिडकर, न्यू शाहूपुरी