शिरोळ : दूषित पाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दोन आठवड्यापूर्वी ऐरणीवर आला होता. हजारो मासे मृत्युमुखी पडल्यामुळे आंदोलने देखील झाली होती. मृत माशांनंतर आता जलपर्णीचा विळखा पंचगंगा नदीला बसत आहे. शिरोळ बंधाऱ्यात जलपर्णी वाढत असून मृत मासे पाण्यातच कुजल्यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पंचगंगा नदीपात्रात केमिकलयुक्त पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते. अक्षरश: मृत माशांचा खच शिरोळ बंधाऱ्यावर दिसत होता. सामाजिक संघटनांनी आंदोलने करून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर पंचगंगा नदी स्वच्छ करून, नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाईचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. अनेक प्रोसेसवर कारवाईदेखील झाली. मात्र, नदीतील प्रदूषण अद्याप कायम आहे. सध्या जलपर्णीने डोके वर काढले आहे. त्यातच पाण्यात काही ठिकाणी मृत झालेले मासे कुजलेले आहेत. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी आहे. पंचगंगेच्या काळ्या पाण्याची शिक्षा आणखी किती दिवस सहन करावी लागणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
फोटो - २१०२२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ -
शिरोळ येथील बंधाऱ्यात जलपर्णी वाढत असून मृत झालेले मासे पाण्यातच कुजल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)