खंडाळा/ लोणंद : पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांची व्यवस्था होण्यासाठी सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी शासनाने निर्णय न घेतल्यास वारकरी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा दिंडीप्रमुखांच्या बैठकीत देण्यात आला.न्यायालयाच्या आदेशानुसार चंद्रभागा नदीच्या वाळवंटात वारकऱ्यांच्या व्यवस्थेला बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारने वारकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडावी. पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या आळंदी ते पंढरपूर वारीच्या परंपरागत प्रथा कायम ठेवण्यात येतील. ज्या गावांना ग्रामप्रदक्षिणांचे मान देण्यात आले आहेत, ते अबाधित राहतील, असे या बैठकीत सांगण्यात आले. माउलींच्या लोणंद मुक्कामी पालखी तळावर श्रीमंत शितोळे सरकार यांच्या पालासमोर पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्यासमवेत सर्व दिंडीप्रमुखांची बैठक झाली. यावेळी पालखी सोहळ्याचे प्रमुख शामसुंदर मुळे, विश्वस्त प्रशांत सुरू, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, दिंडी समाजाचे अध्यक्ष भानुदास ढवळीकर, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मारुती कोकाटे, माउली जळगावकर, राणूमहाराज वास्कर, नामदेवमहाराज वास्कर यांच्यासह दिंडीप्रमुख उपस्थित होते. माउलींच्या वारीमध्ये वाल्हे, माळशिरस यांसारख्या गावांना ग्रामप्रदक्षिणेचे मान दिलेले आहेत. यावर्षी वाल्ह्यातून प्रदक्षिणा घेण्याबाबत मतभेद निर्माण झाले होते. मात्र, श्रीमंत शितोळे सरकारच्या मध्यस्थीने पूर्वीची प्रथा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे माळशिरस येथील प्रदक्षिणेचा मार्ग मोकळा झाला आहे. (प्रतिनिधी/ वार्ताहर)
वारकऱ्यांना चंद्रभागेचे वाळवंटच हवे
By admin | Updated: July 18, 2015 00:17 IST