लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आसुर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त सहकारी साखर कारखान्यासाठी आज, सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी २३ मार्चला मतदान होणार आहे. हा कारखाना जिल्हा बँकेच्या थकबाकीपोटी दालमिया शुगर्सला विक्री केला आहे. मात्र, संचालक मंडळाने कारखाना पुनरुज्जीवित केल्याने कारखान्याचे अस्तित्व कागदावरच आहे.
जिल्हा बँकेच्या १०६ कोटींच्या थकबाकीपोटी २०१२ मध्ये कारखान्याचा लिलाव करण्यात आला. दालमिया शुगर्सने १०८ कोटीला कारखाना विकत घेतला. महायुती सरकारच्या काळात तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कारखाना अवसायनात काढण्याचा निर्णय रद्द केला. अवसायन प्रक्रिया रद्द केल्याने कारखाना पुनरुज्जीवित झाला. त्यामुळे निवडणूक घेण्याबाबत काही मंडळींनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू आहे.
उत्पादक गटातील १५, महिला गटातील २, संस्था गट १ यासह राखीव गटातील ३ अशा २१ जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. पन्हाळ्याचे प्रातांधिकारी भैराप्पा माळी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.