कोल्हापूर : जिल्हा पुरवठा अधिकारीपदी नियुक्ती झालेले साताराचे उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सतीश धुमाळ यांची बदली रद्द होऊन त्या ठिकाणी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी विवेक आगवणे यांची बदलीने नियुक्ती झाली. त्यांनी आज, शनिवारी सायंकाळी उशिरा पदभार स्वीकारला. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही बदल्यांमध्ये अंशत: बदल झाला. याबाबतचे नवे सुधारित आदेश आजच विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. संजय शिंदे यांना गेल्या आठवड्यात पदमुक्त केल्यानंतर उपजिल्हाधिकारी (रोहयो) विद्युत वरखेडकर यांंच्याकडे जिल्हा पुरवठा अधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार होता. या पदावर काल, शुक्रवारी सतीश धुमाळ यांची नियुक्ती झाली होती, परंतु आज अचानक त्यांची बदली रद्द झाल्याचे नवे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले. त्यांच्या जागी नवे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून गडहिंग्लजचे प्रांताधिकारी विवेक आगवणे यांची बदलीने नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आज सायंकाळी उशिरा पदभार स्वीकारला. धुमाळ यांची बदली रद्द झाल्याने ते उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) या पदावरच कार्यरत राहणार आहेत. इतरही अंशत: बदल्यांचे आदेश विभागीय कार्यालयाकडून देण्यात आले. त्यामध्ये भुदरगडचे प्रांताधिकारी अजय पवार यांची सातारा येथे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रं. ६) म्हणून बदलीने नियुक्ती झाली. त्यांच्या जाग्यावर पुण्याच्या उपजिल्हाधिकारी (रोहयो) कीर्ती नलवडे यांची नियुक्ती झाली. गडहिंग्लजचे प्रांताधिकारी विवेक आगवणे यांच्या जाग्यावर आलेल्या परीविक्षाधीन भाप्रसे अधिकारी कुणाल खेमनार यांच्या नियुक्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. (प्रतिनिधी)
विवेक आगवणे जिल्हा पुरवठा अधिकारी
By admin | Updated: September 7, 2014 00:55 IST