विश्वास पाटील -कोल्हापूर -जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विमल पुंडलिक पाटील व प्रिया प्रकाश वरेकर याच प्रबळ दावेदार आहेत. हे पद या वेळेला काही झाले तरी करवीर विधानसभा मतदारसंघातील सदस्यालाच मिळणार, हेदेखील स्पष्ट आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या वाट्याला हे पद गेल्यास आमशीच्या विमल पाटील यांना संधी मिळेल. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पुन्हा आग्रह धरला, तर त्यांच्या गटाकडून गगनबावडा तालुक्यातील प्रिया वरेकर किंवा मनीषा वास्कर यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने इच्छुकांची स्पर्धा मर्यादित आहे. खरी चुरस उपाध्यक्षपदासाठी लागणार आहे. पदाधिकाऱ्यांची पहिल्या अडीच वर्षांची मुदत २० सप्टेंबरला संपत असल्याने येत्या २१ सप्टेंबरला नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होत आहेत. नेते विधानसभा निवडणुकीच्या धावपळीत असल्यामुळे निवडी दहा दिवसांवर आल्या तरी त्याबाबतच्या फारशी हालचाली अद्याप सुरू नाहीत. दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन पदाधिकारी निवडी कराव्यात, अशी चर्चा राज्य पातळीवर सुरू झाली आहे; परंतु कोल्हापुरात तसे होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण पी. एन. पाटील व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, आमदार के. पी. पाटील यांच्यामध्ये भोगावती कारखान्याच्या चौकशीवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादीची संगत नको, अशीच पी. एन. यांची भूमिका आहे. काँग्रेस-स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी ही मुख्यमंत्र्यांच्या ‘शब्दा’वर पाच वर्षांसाठी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला सारून राष्ट्रवादीला बरोबर घेतले जाण्याची शक्यता नाही. काँग्रेस ‘स्वाभिमानी’ला बरोबर घेऊन स्वबळावर या निवडी करण्याची शक्यता आहे. अध्यक्षपद पी. एन. व सतेज पाटील यांच्यापैकी कुणाच्या वाट्याला जाणार यावरच संधी कुणाला मिळणार हे ठरेल. हे पद या दोघांपैकीच कुणाच्या तरी वाट्याला जाणार हेदेखील स्पष्ट आहे. कारण माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गटाचे सहा सदस्य असले तरी ते आज तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये आहेत. संजय मंडलिक यांना पहिल्यांदाच अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने पुन्हा त्यांना संधी देण्याचा मुद्दाच निकालात निघाला आहे. अन्य कोणत्याच नेत्यांकडे हे पद मागण्याएवढे संख्याबळ नाही. आमदार महाडिकही अल्पमतात आहेत. गेल्या निवडीवेळी ही संधी अमल महाडिक यांना मिळू नये म्हणून सतेज पाटील यांनी जोरदार ताकद लावली व त्यात ते यशस्वी झाले. त्यावेळी तोडगा म्हणून या दोघांच्या मतदारसंघाबाहेरील परंतु काँग्रेसचा सदस्य व सतेज पाटील यांचे नेतृत्व मानणारे म्हणून उमेश आपटे यांना ही लॉटरी लागली. आता तोंडावर विधानसभा असल्याने पी.एन. यांचा कोणत्याही स्थितीत अध्यक्षपद आपल्या कार्यकर्त्याला मिळावे, असाच प्रयत्न राहील. आताही त्यांचेच कार्यकर्ते हिंदुराव चौगले उपाध्यक्ष आहेत; परंतु ते राधानगरी तालुक्यातील असल्याने स्वत:च्या करवीर मतदारसंघास हे पद मिळावे, असा पी.एन. यांचा आग्रह राहील तसेच घडण्याची शक्यता जास्त दिसते. गगनबावड्याच्या वरेकर या सतेज पाटील यांना मानणाऱ्या आहेत. परंतु तो तालुका आता करवीर मतदारसंघात येतो. त्यामुळे सदस्या सतेज पाटील गटाची परंतु मतदारसंघ पी. एन. पाटील यांचा असा सुवर्णमध्य काढल्यास प्रिया वरेकर यांना संधी मिळेल. तथापि, पी. एन. यांचा स्वभाव पाहता ते यासाठी कितपत तयार होतील, हे महत्वाचे आहे.कुणाला मानणारेकिती सदस्य...सतेज पाटील०८मंडलिक गट०६पी. एन. पाटील०५सा. रे. पाटील०३महादेवराव महाडिक०२बजरंग देसाई०२संजीवनी गायकवाड०२सत्यजित पाटील०२नरसिंगराव पाटील०२भरमू पाटील०१जयवंतराव आवळे ०१स्वाभिमानी संघटना ०५पाटील-खोत चर्चेतअध्यक्षपद पी. एन. पाटील यांच्या गटाला गेल्यास उपाध्यक्ष कोण याबद्दलच रस्सीखेच असेल. त्यासाठी गृहराज्यमंत्री यांच्या गटातून एकनाथ पाटील व शशिकांत खोत यांची नावे स्पर्धेत आली आहेत. अध्यक्षपद महिलेस मिळणार असल्याने उपाध्यक्षास महत्त्व असते. त्यामुळे हे पद मिळावे यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विद्यमान अध्यक्ष उमेश आपटे यांना फक्त चारच महिने काम करण्याची संधी मिळाली. अल्प कालावधीतही त्यांनी कामाचा ठसा उमटवला. त्यामुळे उपाध्यक्ष म्हणून त्यांना संधी द्यावी, असाही प्रवाह पुढे आला आहे.
विमल पाटील, प्रिया वरेकर दावेदार- जिल्हा परिषद अध्यक्ष निवड :
By admin | Updated: September 11, 2014 00:22 IST