चिपळूण : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांच्या मालकीच्या असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची एक एकर जागा चिपळूणच्या तहसीलदार वृषाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आली. ही कंपनी आतापर्यंत बंदच होती. या एक एकर जागेवर सुमारे १० ते १२ पडक्या इमारती आहेत. तालुक्यातील पिंपळ बुद्रुक गावी मल्ल्या यांची एक एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड नावाची कंपनी उभी होती. ही जागा बिनशेती करण्यात आली होती. मात्र, गेले दोन वर्षे बिनशेतीचा सुमारे ४५ हजारांचा कर मल्ल्या यांनी थकवला होता. त्यामुळे चिपळूणच्या महसूल प्रशासनाने ही जमीन जप्त करण्याची कारवाई केली. तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळकवणेचे मंडल अधिकारी दिवाकर केळुस्कर, तलाठी शुभांगी गोंगाणे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)जप्त केलेल्या एक एकर जमिनीचे लवकरच मूल्यांकन करण्यात येणार असून त्यानंतर येत्या आठ दिवसांत या जमिनीचा लिलाव करण्यात येईल.- वृषाली पाटील, तहसीलदार, चिपळूण
विजय मल्ल्या यांची जमीन जप्त
By admin | Updated: March 22, 2016 00:21 IST