कोल्हापूर : विद्या नऊ वर्षांची, तर ज्योती अकरा वर्षांची असताना बालकल्याण संकुलात दाखल झाली. या दोन युवतींचा विवाह आज, रविवारी गोटे (ता. कऱ्हाड) येथील गिरीश व गजेंद्र या दोन सख्ख्या भावांशी बालकल्याण संकुल येथे झाला. विद्या आणि ज्योती यांचे कन्यादान अनुक्रमे स्नेहल व डॉ. सुभाष आठल्ये आणि डॉ. कश्मिरा व डॉ. सचिन शहा यांनी केले. विद्या ही दहावीपर्यंत शिकली आहे. विद्याचा विवाह गोटे (ता. कऱ्हाड) येथील गिरीश गोविंद वाळिंबे यांच्याशी झाला. गिरीश यांचे शिक्षण बी.ए., एलएल. बी. झाले असून, ते स्कायमेल एक्सप्रेस आयडिया या कंपनीत आॅफिस इन्चार्ज म्हणून काम पाहत आहेत, तर संस्थेची दुसरी कन्या ज्योतीचा विवाह गिरीश यांचे सख्खे बंधू गजेंद्र यांच्याशी झाला. गजेंद्र हे बारावी उत्तीर्ण असून, प्रोजेक्टस अॅँड मोटर्स लिमिटेड या कंपनीत एच. आर. व अॅडमिनिस्ट्रेशन विभागात ते काम करीत आहेत. वडील गोविंद वाळिंबे हे निवृत्त कर्मचारी आहेत. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, माजी महापौर शिवाजीराव कदम, भिकशेठ पाटील, पद्मजा तिवले, व्ही. बी. पाटील, व्यंकाप्पा भोसले, रावसाहेब चौगुले, सुरेश शिरोडकर, ‘निसर्गमित्र’चे अनिल चौगुले, दीपक देवलापूरकर उपस्थित होते. हलगी कडाडली !विद्या आणि ज्योती यांच्या लग्नानिमित्त प्रसिद्ध हलगीवादक राजू आवळे यांची हलगी कडाडली. संपूर्ण संकुलातील सर्व विद्यार्थ्यांनी या दोन बहिणींच्या लग्नाचा आनंद हलगीवादनावर नृत्य करून साजरा केला.
विद्या, ज्योतीला मिळाला जीवनसाथी
By admin | Updated: August 3, 2014 23:38 IST