कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेच्या स्वप्नापासून ते प्रत्यक्षात आणेपर्यंत जी उंची त्याला प्रदान करण्याची विद्यापीठाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या दिग्गजांची आकांक्षा होती, या उंचीवर विद्यापीठाला पोहोचविण्याचे काम कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. त्यातून ते शिक्षण क्षेत्रातील उत्तम ‘मॅनेजमेंट गुरू’ असल्याची प्रचिती आली, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी बुधवारी येथे केले. कुलगुरू डॉ. पवार व बीसीयूडी संचालक डॉ. अर्जुन राजगे यांचा विद्यापीठातील पदावधी संपुष्टात आल्याने आयोजित केलेल्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात चाललेल्या कार्यक्रमात अनेकांनी भावना व्यक्त केल्या.डॉ. पाटील म्हणाले, डॉ. बाळकृष्ण, छत्रपती राजाराम महाराज, यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठाच्या स्थापनेचे स्वप्न पाहताना आणि ते प्रत्यक्षात आणताना जी उंची त्याला प्रदान करण्याची त्यांची आकांक्षा होती, त्या उंचीवर विद्यापीठाला पोहोचविण्याचे बहुमोल कार्य डॉ. एन. जे. पवार यांनी केले. डॉ. पवार म्हणाले, शिवछत्रपतींच्या नावाचा सन्मान, लौकिक अबाधित ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ती लक्षात ठेवून विद्यापीठाचे मानांकन उंचावणे, संशोधनात्मक वृद्धी करणे, आदी कामे केली.डॉ. पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन कुलगुरू डॉ. पवार व डॉ. राजगे यांना निरोप देण्यात आला. प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, डॉ. डी. के. गायकवाड, प्रा. मच्छिंद्र सकटे, व्यंकाप्पा भोसले, शंकरराव कुलकर्णी, प्रताप माने, प्राचार्य हिंदुराव पाटील, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागप्रमुख डॉ. निशा पवार, माने गुरुजी, रमेश पोवार, आदी उपस्थित होते. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी प्रास्ताविक केले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर व नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कुलगुरू पवार शिक्षणक्षेत्रातील उत्तम ‘मॅनेजमेंट गुरू’
By admin | Updated: February 26, 2015 00:48 IST