कोल्हापूर: लॉकडाऊन काळात मातीमोल विकाव्या लागणाऱ्या भाजीपाल्याला आता लॉकडाऊन थोडाफार शिथिल झाल्याने चांगला दर येऊ लागला आहे. गुरुवारी बाजार समितीत भाजीपाल्याची आवक वाढली, पण त्याचबरोबर दर वाढल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होते. घाऊक बाजारात वरणा, गवारीला १० किलोला ६०० रुपये असा उच्चांकी दर या हंगामात पहिल्यांदाच मिळाला आहे.
लॉकडाऊनमुळे बाजार समितीत आठ दिवस सौदे बंद होते. सोमवारपासून ते कोरोनाचे नियम पाळत सुरू करण्यात आले. तत्पूर्वी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून भाजीपाल्याचे दर दिवसागणिक गडगडतच होते. ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी त्याप्रमाणे नियोजन करतात, पण यावर्षी भाजीपाला शेतीचा पूर्वार्ध तोट्यातच गेला आहे. आता मात्र शेवटच्या टप्प्यात चांगला दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान थोडेफार भरून निघणार आहे.
चौकट ०१
किरकोळ बाजारात भाजीपाला महागला
घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही भाजीपाला महागणार असल्याने ग्राहकांना खिशाला चाट पडणार आहे. साधारणपणे सर्वच भाज्या आता ८० रुपये किलोवर गेल्या आहेत. पालेभाज्यांच्या पेंडीचा दर २० रुपयांच्या पुढे गेला आहे.
तक्ता
बाजार समितीतील घाऊक दर (१० किलोचे)
शेतमाल आवक दर(किमान व कमाल)
कोबी ५८५ पोती ४० ते १००
वांगी ३३४ करंडी १०० ते ३५०
टोमॅटो ३०८७ कॅरेट ५० ते १५०
ओलीमिरची १२७२ पोती ५० ते १५०
ढबू ५०० पोती १०० ते ३००
गवार २०४ पोती ३०० ते ६००
भेंडी २८८ करंडी १५० ते ३५०
वरणा १५ पोती ५००ते ६००
दाेडका १३६ करंडी २०० ते ४००
चौकट
कोथिंबिरीसह पालेभाज्याही वाढल्या
कोथिंबिरीची आवक ४२ हजार ५०० पेंड्या इतकी झाली असून, शेकड्याचा दर ७५० ते १२०० रुपये झाला आहे. मेथीची ३१ हजार ७०० आवक झाली असून ११०० ते १५०० रुपये शेकड्याचा दर झाला आहे. पोकळ्याची १२०० पेंडीची आवक असून दर १ हजार रुपये शेकड्याचा दर आहे.