कोल्हापूर : न्यूमोनियामुळे देशभरातील होणाऱ्या बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी आता लहान बाळांना न्यूमोनिया प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. ‘निमोकॉकल कॉज्युगेट व्हॅक्सिसन’ असे या लसीचे नाव असून, राष्ट्रीय नियमित लसीकरणामध्ये या लसीचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रात सोमवारपासून (दि. १२ जुलै) हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने या लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. ही लस तोंडावाटे नसून, ती टोचण्यात येणार आहे.
भारतामध्ये न्यूमोनियामुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. पाच वर्षांखालील मुले या आजाराला बळी पडतात. दरवर्षी देशामध्ये ५० हजार हून अधिक बालकांचा निमोकॉकल न्यूमोनियामुळे मृत्यू होतो. याची दखल केंद्र शासनाने २०१७ पासून टप्प्याटप्प्याने या लसीचा राष्ट्रीय नियमित लसीकरणामध्ये समावेश केला आहे. राज्यामध्ये कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता गृहीत धरून त्याचा लहान मुलांना संसर्ग होऊ नये यासाठी तातडीने हे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
या लसीकरणाच्या दृष्टीने राज्यभर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू आहे. जिल्हा आणि तालुका स्तरावरून याबाबतची माहिती प्रसारित करण्यात येत आहेत.
चौकट
असे आहेत डोस
लाभार्थ्यांच्या वयानुसार खालीलप्रमाणे लस देण्यात येणार आहे.
बाळाला दीड महिना पूर्ण झाल्यानंतर ....पहिला डोस
साडेतीन महिने पूर्ण झाल्यानंतर... दुसरा डोस
नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर.... तिसरा डोस
कोट
कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याचा लहान मुलांना संसर्ग होऊ शकतो. म्हणूनच निमोकॉकल कॉज्युगेट व्हॅक्सिनचा कार्यक्रम १२ जुलैपासून सुरू करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या बालकांना हे लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. एकही बालक यातून सुटू नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर