कर्नाटक सरकारतर्फे येत्या शुक्रवार, दि. १७ सप्टेंबर रोजी विशेष राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार असून, या एका दिवसात २५ ते ३० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
या विशेष राज्यव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत बेळगाव जिल्ह्यात ३ लाख डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील १० लाख लोकांचे पहिले लसीकरण अद्याप प्रलंबित आहे.
यासाठी राज्यव्यापी मोहिमेमध्ये खासगी हॉस्पिटल्सनादेखील सामावून घेण्यात आले असून, या हॉस्पिटल्समध्ये १७ सप्टेंबर रोजी सर्वांना मोफत लस उपलब्ध असणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे आवश्यक डोस त्या दिवशी आरोग्य खात्याकडून खासगी हॉस्पिटल्सना पुरविले जातील. खासगी हॉस्पिटल्स सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी त्यांच्याकडून साधारण५०० ते १५०० पर्यंत डोस दिले जाऊ शकतात.
राजव्यापी लसीकरण मोहिमेच्या पूर्वतयारीच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मागीलवेळी बेळगावने १ लाखाचा पप्पा पार केला होता. आता यावेळी ३ लाखांपर्यंत डोस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आल्याचे सांगितले. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व ती तयारी करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. शहरी भागात १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.