लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आरोग्य विभागाने शहर आणि जिल्ह्यातील १०६ खासगी रूग्णालयांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला परवानगी दिली आहे. यातील ३२ रूग्णालयांत पाच महिन्यांपासून लस दिली जात आहे. नुकतीच नव्याने ७४ रूग्णालयांना लस देण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे येत्या काही दिवसांत सर्व १०६ खासगी रूग्णालयांत विविध कंपन्यांची लस विकत मिळणार आहे.
कोरोना आजाराची साथ आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त लोकांच्या लसीकरणाचे नियोजन सरकारने केले आहे. पण लसीचे उत्पादन आणि मागणीमध्ये तफावत असल्याने जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याचे चित्र आहे. सर्वच सरकारी लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. अनेकांना लस घेण्यासाठी केंद्रावर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. दुसऱ्या लसीच्या डोसची तारीख मिळूनही त्यादिवशी लस मिळत नसल्याचे चित्र आहे. फुकटची लस मिळवताना धावाधाव करावी लागत आहे. यामुळे जिल्ह्यात अपेक्षित गतीने लसीकरण झालेले नाही. म्हणूनच ऐपत असणाऱ्यांनी विकतची लस घेण्यासाठी खासगी रूग्णालयांना परवानगी दिली जात होती. पहिल्या टप्प्यात शहर, जिल्ह्यात केवळ ३२ रूग्णालयांना लस देण्याचा परवाना देण्यात आला होता. पण आता लसीकरणाची गती वाढण्यासाठी आणखी ७४ रूग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे.
कोट
अधिकाधिक लसीकरण करून कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न आरोग्य प्रशासन करत आहे. आर्थिक कुवत असणाऱ्यांनी खासगी रूग्णालयात लस घेतल्यास सरकारी लसीकरण केंद्रांवरील ताण कमी होईल. खासगीमध्ये सहजपणे लस उपलब्ध होण्यासाठी नव्याने ७४ रूग्णालयांना परवानगी दिली आहे. आता एकूण १०६ खासगी रूग्णालयांत सरकारने निर्धारित केलेल्या किमतीत लस घेता येईल.
- डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
चौकट
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने विविध कंपन्यांच्या लसीचे दर निश्चित केले आहेत. या निश्चित केलेल्या दरानुसार कोविशिल्ड लसीसाठी ७८० रूपये, कोव्हॅक्सिन लसीसाठी १४१० रूपये, स्पुतनिक लसीसाठी ११४५ रूपयांपर्यंत खासगी दवाखान्यांनी पैसे घेणे अपेक्षित आहे. यापेक्षा अधिक पैसे घेतलेल्या दवाखान्यांवर कारवाई होऊ शकते.
चौकट
सर्वाधिक कोल्हापूर शहरात
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेल्या शहर, जिल्ह्यातील ३२ रूग्णालयांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला परवानगी आहे. याशिवाय नव्याने परवाना मिळालेल्या रूग्णालयांची संख्या तालुकानिहाय अशी : आजरा : १, भुदरगड : १, गडहिंग्लज २, गगनबावडा : १, हातकणंगले १२, कागल : ३, करवीर : ५, पन्हाळा : २, शाहूवाडी : १, शिरोळ : १२, कोल्हापूर शहर : ३४