मलकापूर : शाहूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडील गटशिक्षणाधिकारी हे पद गेली दोन वर्षे रिक्त असल्याने येथील शैक्षणिक कामाचा बोजवारा उडाला आहे. जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने नवीन गटशिक्षणाधिकारी पद भरण्याची मागणी ग्रामस्थ व पालकवर्गांतून होत आहे.शाहूवाडी तालुका दुर्गम व डोंगराळ भागात वसला आहे. येथे १३१ गावांसह २५० वाड्या-वस्त्यांतून तालुका विभागला आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या २७५ प्राथमिक शाळा आहेत, तर ८८ माध्यमिक हायस्कूल आहेत. ३०० च्यावर अंगणवाडी व मिनी अंगणवाडी आहेत. ९५० प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत, तर ५० शिक्षकेतर कर्मचारी काम करीत आहेत. सुमारे पाच ते सात हजार विद्यार्थी-विद्यार्र्थिनी शिक्षण घेत आहेत. या सर्वांवर देखरेख करण्यासाठी तालुकास्तरावर गटशिक्षण अधिकारी पद असते. तत्कालीन गटशिक्षणाधिकारी डॉ. कमळकर यांची बदली झाल्याने गेली दोन वर्षे शाहूवाडी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त आहे. त्यामुळे येथील शैक्षणिक कामांचा बोजवारा उडाला आहे.विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली आहे. शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत तालुकास्तरावर शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते; मात्र अधिकारी नसल्याने प्रशिक्षण घेणार कोण? त्यावर वचक कोणाचा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त चार्ज कनिष्ठ दर्जाच्या विस्तार अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यांचे काम सांभाळून त्यांना अतिरिक्त कामाचा बोजा देण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांवर त्यांचा वचक नाही. संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. शासनाने शिक्षकांना शाळेच्या जवळ राहण्याचा आदेश काढला आहे; मात्र या आदेशाला शिक्षकांनी केराची टोपली दाखविली आहे.शाहूवाडी तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाकडे रिक्त असणारे गटशिक्षण अधिकारी पद तातडीने भरावे, अन्यथा भाजपतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.- राजू प्रभावळकर, उपाध्यक्ष, भाजपप्राथमिक शिक्षणाचा संपूर्ण दर्जा ढासळला आहे. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शाहूवाडी तालुक्याला गटशिक्षणाधिकारी पद तातडीने भरावे. - प्रकाश कांबळे
दोन वर्षे गटशिक्षणाधिकारी पद रिक्त
By admin | Updated: January 20, 2015 23:36 IST