लोकमत न्यूज नेटवर्क --उत्तूर : दहा हजार लोकवस्ती असणाऱ्या उत्तूर (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीची जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून जिल्ह्यात निवड झाली. जिल्हा स्मार्ट ग्रामपदी निवड झाल्याने ग्रामपंचायतीचे मनोबल वाढले असून, गावच्या विकासास ४० लाखांचा निधी प्राप्त होईल. जिल्हा स्मार्ट योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानुसार स्वच्छता व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर आदी निकष ग्रामपंचायतीने पूर्ण केले होते. ग्रामपंचायतीची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या पथकाने पाहणी केली होती.जिल्ह्यात सर्वाधिक गुण ग्रामपंचायतीस मिळाल्याने जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून निवड झाल्याचे उत्तूर ग्रामपंचायतीस कळविण्यात आले. निवड झाल्याचे कळताच ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. ग्रामपंचायतीने नुकताच तालुक्यात स्मार्ट गाव निवड झाल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सरपंच हर्षदा खोराटे, उपसरपंच धोंडिराम सावंत, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र नुल्ले यांनी पुरस्कार स्वीकारला होता. जिल्हा स्मार्टमध्ये निवड झाल्याने ग्रा.पं.चे मनोबल उंचावले आहे. उत्तूर गाव जिल्हा स्मार्ट करण्यासाठी सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, प्रशासकीय यंत्रणा, ग्रा. पं. चे पदाधिकारी, कर्मचारी, आरोग्य, पशुसंवर्धन विभाग, ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. आता राज्यात उत्तूर गाव स्मार्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार. - उमेश आपटे, जि.प. सदस्य. आतापर्यंत ग्रामपंचायतीने बारा पुरस्कार मिळविले. जिल्हा स्मार्टमध्ये गावची निवड झाल्याने गावच्या विकासास गती मिळणार आहे. याकामी जि. प.चे सदस्य उमेश आपटे, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. - हर्षदा खोराटे, सरपंच, उत्तूर.
उत्तूर ग्रामपंचायत जिल्हा स्मार्ट ग्राम
By admin | Updated: May 5, 2017 23:55 IST