विश्र्वास पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यभरातील सुमारे ६० हजारांहून अधिक तरुणांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या फार्मसी पदविका व पदवी प्रवेशाचा घोळ राज्य शासनाकडून सुरू आहे. अगोदर पदविका व नंतर पदवीचा प्रवेश निश्चित करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ही पद्धत चुकीची असल्याचे पालक व संस्थाचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही अस्वस्थता आहे. पदविका प्रवेश अगोदर निश्चित केल्यास या विद्यार्थ्यांना पदवीसाठीच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागेल, अशी भीती आहे.
पदविका प्रवेशासाठी ८ जानेवारीची अंतिम मुदत आहे. पदवीसाठी ११ जानेवारीस गुणवत्ता यादी लागणार असून १२ ते १४ जानेवारीदरम्यान पहिल्या फेरीचा कॅप राऊंड आहे. पदविका प्रवेशासाठी राज्यात ४० हजार जागा असून सुमारे ८० हजार अर्ज येतात. पदवीसाठी २० हजार जागा असून त्यासाठीही वर्षाला सरासरी ५० हजार अर्ज येतात. तंत्रशिक्षण संचालकांतर्फे ही प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांना मुख्यत: पदविका घेऊन दुकान सुरू करायचे असते ते विद्यार्थी बारावीनंतर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. यावर्षी पदविकेचे प्रवेश अगोदर बंद होणार असल्याने ज्यांना पदवीला प्रवेश हवा आहे ते विद्यार्थी साशंकतेपोटी पदविका अभ्यासक्रमांसाठीही वळले आहेत. पदवीसाठी प्रवेश मिळालाच नाही तर काय या भीतीपोटी हे विद्यार्थी पदविका अभ्यासक्रमाकडे वळल्याने पदविका अभ्यासक्रमांतील स्पर्धा तीव्र होणार आहे. याउलट ज्यांना नंतर पदवीसाठी प्रवेश मिळेल त्या विद्यार्थ्यांचे पदविकाचे प्रवेश नंतर रद्द होतील व त्यासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रवेश घेता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया बदलून अगोदर पदवीचे प्रवेश निश्चित करावेत, अशी मागणी विद्यार्थी-पालक व संस्थाचालकांतूनही होत आहे.
------------------------------------------
प्राधान्यक्रम असेही..
पदविकासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांत मुख्यत: ज्यांना स्वत:चे दुकान सुरू करायचे आहे, एम.आर. औषध कंपन्यांमध्ये नोकरी हे प्राधान्यक्रम असतात. पदवीच्या विद्यार्थ्यांचे औद्योगिक कंपन्या, संशोधन व शिक्षणक्षेत्रात हे प्राधान्यक्रम असतात. त्यातील काहीच नाही जमले तरच तो शेवटी दुकान सुरू करण्याचा विचार करतो.