कोल्हापूर : कोल्हापूर शहर हद्दवाढीच्या मागणीचा शहर परिसरातून जोर वाढत असून कृती समितीसह राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाचे कार्यकर्तेही आता या प्रश्नावर होऊ घातलेल्या आंदोलनात सहभागी होत आहेत. मिरजकर तिकटी चौकात गुरुवारी लावण्यात आलेल्या फलकाच्या अनावरण प्रसंगी महायुतीचेच कार्यकर्ते जास्त संख्येने उपस्थित होते.मिरजकर तिकटी चौकात लावण्यात आलेल्या फलकाद्वारे ‘शहराची हद्दवाढ होणार म्हणजे होणारच’ असा आग्रह धरतानाच हद्दवाढीला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना खोचक शब्दात टोमणे मारण्यात आले आहेत.‘ जनतेला सोडून राहता आमच्या शहरात.. केएमटी आमची.. पाणी आमचं.. दवाखाना आमचा.. शाळा-कॉलेज आमचं.. आणि मापं बी आमचीच काढता व्हय राव.. हे काय बरं नाय राव’ असा टोमणा हद्दवाढ विरोधी कृती समितीला लगावला आहे. या निवृत्ती चौक पाठोपाठ आता मिरजकर तिकटी चौकात लावण्यात आलेल्या फलकावरुन पुढील काळात समर्थक व विरोधक यांच्या ‘फलक युद्ध’ रंगण्याची शक्यता आहे.हद्दवाढ समर्थकांनी, ‘अरे कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय रहात नाही, हद्दवाढ आमच्या हक्काची.. अशा घोषणांनी मिरजकर तिकटी चौक दणाणून सोडला. यावेळी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषत: सत्तेत असलेल्या भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती ठळकपणे दिसून येत होती. यावेळी आर. के. पोवार, सचिन चव्हाण, बाबा इंदूलकर, महेश जाधव, विजय जाधव, दिलीप देसाई, प्रसाद जाधव, विक्रम जरग, बाजीराव चव्हाण, अशोक पोवार, बाबा पार्टे, हर्षल सुर्वे, सुभाष देसाई संगीता खाडे आदी उपस्थित होते.
मापं बी आमचीच काढतांय व्हय, हे बरं नाय राव !; कोल्हापुरात हद्दवाढ कृती समितीचा फलक लक्षवेधी
By भारत चव्हाण | Updated: February 6, 2025 20:17 IST