वस्त्रोद्योगामुळे शहरात औद्योगिक पसारा मोठ्या प्रमाणात आहे. उद्योग, व्यवसायाच्या निमित्ताने शहरात वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यातील काही वाहने शहरातील अनेक भागांत अनेक वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला धूळ खात बेवारस स्थितीत पडलेली होती. सूचना देऊनही ही वाहने हलवली जात नव्हती. या चारचाकी, तीनचाकी, दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होत होता. तसेच दुकाने, हॉटेलसमोर रस्त्यावरच जाहिरातींसाठी लावलेल्या फलकांमुळेही रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत होता. या संदर्भात शहर वाहतूक नियंत्रण शाखा व इचलकरंजी नगरपरिषदेकडील अधिकारी व कर्मचारी यांनी शनिवारी संयुक्त मोहीम राबविली. रस्त्याच्या बाजूला धूळ खात पडलेली १ टाटा सुमो, १ मारुती कार, ३ रिक्षा, ३ दुचाकी अशी वाहने ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. तसेच ५ हातगाडे व रस्त्यावर जाहिरातींसाठी लावलेले ५५ फलक जप्त करून कारवाई करण्यात आली. यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असून बेकायदेशीरपणे रस्त्याकडेला बेवारसपणे लावलेली वाहने, तसेच जाहिरातींसाठी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे फलक लावणे असे आढळल्यास संबंधिता विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मोरे यांनी सांगितले.
(फोटो ओळी) नगरपालिका व पोलिसांनी बेवारस वाहने जप्त केली.