परिस्थितीशी दोन हात करत आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने हाकणाऱ्या दोन उमद्या तरुणांच्या अकाली मृत्यूने हलकर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रत्नदीप संजय व्हसकोटी ऊर्फ नन्या (वय ३२) व कुंबळहाळ येथील पुंडलिक आप्पय्या सुतार (वय ३०) अशी दुर्दैवी तरुणांची नावे आहेत.
सुतार याचे १० दिवसांपूर्वी कोरोनाने तर व्हसकोटी याचे दोन दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
आपापल्या व्यवसायाच्या निमित्ताने दोघेही हलकर्णीत सर्वपरिचित होते. व्हसकोटी हा स्वत:ची क्रुझर चालवून व मिळेल तेथे ड्रायव्हिंगचे काम करत होता. त्यांच्या वडिलांचेही ४ महिन्यांपूर्वी निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रत्नदीपवरच होती. त्याच्या पश्चात आई, पत्नी, तीन व दीड वर्षाची दोन मुले आहेत.
पुंडलिक सुतार याचे हलकर्णीत काच व अॅल्युमिनिअमचे दुकाने आहे. किरकोळ आजाराचे निमित होऊन कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यालाही आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ, पत्नी, ६ वर्षांचा मुलगा व ४ वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
----------------------
* रत्नदीप व्हसकोटी : १९०५२०२१-गड-०४
* पुंडलिक सुतार : १९०५२०२१-गड-०५