म्हासुर्ली : एकीचे बळ, पूर्वजांनी घालून दिलेले आदर्श आणि गावाच्या विकासाचे ध्येय या त्रिसूत्रीच्या जोरावर धामणी खोऱ्यातील हरपवडे (ता. पन्हाळा) या छोट्याशा गावाने ग्रामपंचायतीची निवडणूक ग्रामपंचायत स्थापनेपासून सलग १३ वेळा बिनविरोध करून राज्यात एक विक्रम केला आहे.हरपवडे हे धामणी खोऱ्यातील छोटेसे गाव. हरपवडे आणि निवाचीवाडी अशा या ग्रूप ग्रामपंचायतीची १९५६ ला स्थापना झाली. प्रथम सरपंच म्हणून कै. मारुती सुभाना चौगले यांनी काम केले. त्यानंतर सलग २० वर्षे कै. देमजी भवाना चौगले यांनी गावाची धुरा सांभाळली. गावाच्या एकीच्या बळावरच प्रत्येक निवडणुक ीवेळी मंदिरात ग्रामसभा घेऊन त्यातच प्रत्येक सदस्याची निवड करण्याची परंपरा सुरुवातीच्या काळातच सुरू झाली आणि त्याचे पालनही आताची पिढी तितक्याच आत्मीयतेने करीत आहे. सुरुवातीच्या काळात वीज व पाणीपुरवठा, सातवीपर्यंत शाळा असा गावाच्या विकासाचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर कै. श्रीपती चौगले, कै . हरी चौगले, मंगल सुतार, अलका चौगले, महादेव कांबळे, संजय गुरव यांच्या सरपंचपदाच्या काळात गावाने एकीच्या जोरावर प्रगती केली. या गावाने आतापर्यंत तालुक्यातील पहिले तंटामुक्त गाव होण्याचा मान मिळविला. लोकवर्गणीतून समृद्घ शाळेने जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळविला. केंद्र सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कारही मिळविला. या गावातील व शाळेतील अनेकांनी आयुक्त, न्यायाधीश, डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, प्राध्यापक, तंत्रज्ञ अशी मानाची पदे पादाक्रांत केली आहेत.या गावाने आजपर्यंत सलग १३ वेळा निवडणूक बिनविरोध करूनही शासन स्तरावर या गावास बेदखल केले आहे. गावास आदर्श ग्राम योजनेत समाविष्ट करणे गरजेचे आहे. मात्र, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे गाव विकासापासून वंचित आहे. आजही या गावास स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यान्वित नाही. मंदिरासह शाळा, अंगणवाडी, पाणीयोजना, सभागृहासाठी निधी मिळाला; मात्र गावची दखल सरकारी पातळीवर घेत नसल्याबद्दल गावकरी खंत व्यक्त करीत आहेत.स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालयासाठी भरघोस निधी मिळून प्रशस्त ग्रामसचिवालय उभारण्याची मागणी तसेच अंतर्गत रस्ते, गटर्स, सुसज्ज ग्रंथालय व धामणी नदीवर घाट, समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागगणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)खास बाब म्हणून निधी मिळावा खासदार महाडिक यांनी जाहीर केल्याप्रमाणे या बिनविरोध ग्रामपंचायतीसाठी दहा लाखांचा निधी मिळावा, सलग १३ वेळा निवडणूक बिनविरोध करणाऱ्या या गावास जिल्हा नियोजन मंडळाने खास बाब म्हणून निधी द्यावा, अशी मागणी होत आहे.
हरपवडे ग्रामपंचायत स्थापनेपासून बिनविरोध
By admin | Updated: July 24, 2015 00:41 IST