कोल्हापूर : जिल्हा परिषद इमारतीसमोर असलेल्या कागलकर हाऊसच्या संरक्षक भिंतीजवळ असलेल्या १३ विविध प्रकारच्या झाडांची कत्तल जिल्हा परिषद प्रशासनाने केल्याचा आरोप प्रजासत्ताक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केला आहे. यातील दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी देसाई यांनी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे केली आहे. जिल्हा परिषद प्रशासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत असते. तसेच वृक्षलागवडीला प्रोत्साहनही देत असते; पण कागलकर हाऊसच्या आवारातील पाच काटेरी बाभूळ, पटना कॅशिया चार, सुबाभूळ दोन, विलायत चिंच व करंज प्रत्येकी एक अशा तेरा झाडांवर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने कुऱ्हाड चालविली आहे. बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याचे कळताच देसाई यांनी महानगरपालिका वृक्षप्राधिकरणाच्या माध्यमातून पंचनामा केला. विनापरवाना तोडलेली झाडे पंचगंगा स्मशानभूमीत जप्त करून घेऊन जाणे अपेक्षित होते; परंतु एका रात्रीत तोडलेली सुमारे दहा टन वजनाची झाडे गायब झाली आहेत. जिल्हा परिषदेच्या या कारभाराबद्दल पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. नागाळा पार्कात १०० झाडांची कत्तल : प्रजासत्ताकनागाळा पार्क येथील नागोबा देवालयाशेजारील रि.स.नं २४९ मधील १०० झाडांची कत्तल केल्याप्रकरणी महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणने काल, बुधवारी तीन दिवसांत खुलासा करण्याची नोटीस प्रवीणसिंहराजे घाटगे यांना बजावली. याबाबत ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी लेखी तक्रार केली होती. काल नागाळा पार्क येथील १०० वृक्षांची विनापरवाना तोड केल्याप्रकरणी प्राधिकरणाकडे देसाई यांनी तक्रार केली. यामध्ये कॉरिया ९० व वर्डचेरीच्या १० झाडांचा समावेश आहे. यानुसार घाटगे यांना प्राधिकरणाने महाराष्ट्र (नागरी) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ अन्वये विनापरवाना वृक्षतोड केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.
जिल्हा परिषदेकडून झाडांची विनापरवाना कत्तल
By admin | Updated: December 11, 2014 23:43 IST