इचलकरंजी : आमराई रोड परिसरातील देवमोरे यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. मृतदेह अनोळखी असून, त्याच्या अंगावर, पायावर व डोक्यावर वर्मी घाव असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हा घातपात की आत्महत्या याबाबत तसेच मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, देवमोरे मळ्यात आमराई परिसरातील नागरिक सोमवारी सहा वाजण्याच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी पाहणी केली असता, विहिरीत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबतची माहिती त्वरित पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. विहिरीजवळ पोलिसांना एका पुरुषाच्या चपला आढळून आल्या आहेत. यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती. ही आत्महत्या आहे की घातपात, याची घटनास्थळी चर्चा सुरू होती. त्यानुसार पोलीस माहिती घेत आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल व मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सर्व माहिती स्पष्ट होणार आहे.