जयसिंगपूर : कोरोना रुग्णांकडून घेतलेली जादा रक्कम परत करण्याचे आदेश लेखापरीक्षकांनी जयसिंगपूर शहरातील एका खासगी रुग्णालयाला दिले आहेत. सुमारे ५५ हजार रुपयांची ही रक्कम जादा घेतल्याचे आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दानोळी येथील पती, पत्नी कोरोनाबाधित झाल्याने त्यांना जयसिंगपूर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने जादा बिले घेतल्याची तक्रार त्यांनी ‘आंदोलन अंकुश’ या सामाजिक संस्थेकडे केली होती. रुग्णालयाने जादा औषधे दिल्याचे कागदोपत्री दाखविले होते. मात्र, प्रत्यक्षात रुग्णाला दिलेल्या बिलामध्ये त्या औषधांचा उल्लेख नव्हता. लेखापरीक्षकांना बिलामध्ये तफावत दिसून आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. जादा घेतलेली रक्कम संबंधितांना परत करण्याचे आदेश लेखापरीक्षकांनी रुग्णालयास दिले आहेत.