आजरा : आजरा तालुक्यात वास्तव्यास असणाऱ्या टस्कर हत्तीने हाळोली, वेळवट्टी, माद्याळ या ठिकाणी ऊस, भात रोप लागण, तरवे व नारळाच्या झाडांचे सुमारे ८० हजारांचे नुकसान केले आहे. घाटकरवाडी परिसरातील हत्ती रात्री हाळोली परिसरात दाखल झाल्याने भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. हाळोलीतील यमुताई शेलार यांच्या शेतातील ८ नारळ झाडे व केळीच्या झाडांचे नुकसान केले आहे.
हाळोली हद्दीत जमीन असलेल्या यमुताई शेलार यांच्या शेतातील ८ नारळाची झाडे टस्कर हत्तीने उन्मळून टाकली आहेत. दहा-बारा केळींचेही नुकसान केले आहे. गोविंद धुरी यांच्या भातरोप लावण केलेल्या क्षेत्रात तुडवण केल्याने नुकसान झाले आहे.
माद्याळ येथील हणमंत शेळके, सुरेश शेळके, शिवाजी शेळके व आण्णा बोलके यांच्या एक एकर क्षेत्रातील ऊसाचे नुकसान केले आहे. वेळवट्टी येथील रवींद्र गोरे यांच्या ऊस व भात क्षेत्राचे नुकसान केले आहे. रात्री एकत्र आलेल्या दोन टस्करांनी अंदाजे ८० हजारांचे नुकसान केले आहे. वनविभागाचे वनपाल सुरेश गुरव, वनरक्षक तानाजी गवळी-कट्टी यांनी हत्तीकडून नुकसान केलेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत.
चौकट :
दोन टस्कर हत्ती एकत्र आल्याने भीतीयुक्त वातावरण
तालुक्यात दोन टस्कर हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहेत. दिवसा जंगलात व रात्री शेतकऱ्यांच्या पिकात अशी त्यांची दिनचर्या आहे. घाटकरवाडी, मसोली, हाळोली या गावांमध्ये टस्कर हत्ती रात्रीच्यावेळी घुसला आहे. मोठ्याने चित्कारून दहशत निर्माण केली आहे. रात्रीपासून दोन्ही टस्कर हत्ती एकत्र आल्याचे पायाच्या ठशावरून लक्षात आल्याचे वनरक्षक तानाजी कवळीकट्टी यांनी सांगितले.
फोटो ओळी : हाळोली (ता. आजरा) येथील यमुताई शेलार यांच्या शेतातील टस्कर हत्तीने उन्मळून टाकलेली नारळाची झाडे.
क्रमांक : १२०७२०२१-गड-०३