हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील २६ वर्षांच्या युवकाची ७ जुलै २०२१ रोजी कोरोना चाचणी करण्यात आली. तो पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याची तब्येतही बरी झाली; परंतु पुढच्या सर्वेक्षणामध्ये त्याला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याच तालुक्यातील दुर्गवाडीच्या ३८ वर्षाच्या युवकालाही याच विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ३ जुलै रोजी तो कोरोना पॉझिटिव्ह आला होता. करवीर तालुक्यातील निगवे दुमाला १३ वर्षाच्या शाळकरी मुलीला ही लागण झाल्याचा अहवाल रविवारी आला आहे. ती ६ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह आली होती.
ज्यांचा अहवाल डेल्टा प्लसचा आलेला आहे त्यांच्या नजिकच्या संपर्कात आलेल्यांचीही पुन्हा तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.