इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या निवृत्ती दौलत थोरवत (वय ६४, रा. आवळे हायस्कूलजवळ, कोरोची) यांचा नदीत बुडून मृत्यू झाला. तर प्रोसेसर्सच्या रसायनयुक्त पाण्याच्या हौदात बुडून सुनील कृष्णा जनवाडे (४७, रा. जनवाडे मळा, टाकवडे, ता. शिरोळ ) यांचा बुडून मृत्यू झाला. याबाबत अनुक्रमे गावभाग आणि शहापूर पोलिस ठाण्यात शनिवारी नोंद झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोरोची (ता. हातकणंगले) येथील निवृत्ती थोरवत हे सकाळी इचलकरंजीतील पंचगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी आले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. यावेळी घाटावर उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढले. घटनास्थळी जीवन मुक्तीचे अनिल घोडके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल होऊन त्यांनी उपचारासाठी थोरवत यांना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या खिशातील एस. टी. तिकिटावरून ते कोरोचीतील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांना शोधून काढले. याबाबतची गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. इचलकरंजीतील डेक्कन प्रोससर्समध्ये टाकवडे (ता. शिरोळ) येथे राहणारे सुनील आणि अनिल जनवाडे हे दोेघे भाऊ काम करतात. सुनील हे १ जुलै रोजी रात्र पाळीसाठी कामावर आले होते. प्रोसेसर्समधील अंतर्गत सांडपाणी प्रक्रिया केंद्रात काम करताना तोल जाऊन ते रसायनयुक्त पाणी असलेल्या हौदात पडले. सकाळी आठ वाजता त्यांचा भाऊ अनिल हे कामावर आले असता सुनील दिसून न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी हौदात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला. याबाबत माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. (वार्ताहर)
दोन घटनांमध्ये दोघांचा बुडून मृत्यू
By admin | Updated: July 3, 2016 00:40 IST