आजरा तालुक्यातील जेऊर-चितळे परिसरात टस्करचा धुडगूस सुरु आहे. रखवालीसाठी गेलेल्या नागरिकांना रस्ता ओलांडताना टस्करने दर्शन दिले. टस्कराने रात्री चितळे, जेऊर गावाजवळ येऊन मोठ्याने चित्कारल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. टस्कराने ऊस, केळी, नारळ पिकांचे नुकसान केले आहे. तालुक्यातील मसोली, वेळवट्टी, देवर्डे परिसरात धुडगूस घालत असलेला टस्कर हत्ती गेल्या आठ ते दहा दिवसापुर्वी चितळे परिसराकडे गेला आहे. चितळे, भावेवाडी, जेऊर परिसरात टस्करने दहशत पसरविल्याने नागरिक भितीच्या छायेखाली आहेत. त्रिभुवने फार्महाऊस मधील ऊसासह पाण्याची टाकी फोडून अन्य पिकांचेही नुकसान हत्तीने केले आहे. नेमिनाथ त्रिभुवने, विजय त्रिभुवने, शशिकांत त्रिभुवने, सचिन सरदेसाई यांच्या ऊस, केळींचे टस्करने प्रचंड नुकसान केले आहे. शामराव गुडूळकर यांचा पावरट्रिलर उचलून टाकल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. टस्कर आता नागरी वस्तीजवळ आला आहे त्यामुळे सर्वत्र भितीयुक्त वातावरण पसरले आहे.. वनविभागाच्या पथकाकडून रात्रीच्यावेळी टस्कराला हुसकावून लावण्यासाठी गस्त घातली जात आहे.
चितळे, जेऊर परिसरात टस्करचा धुडगूस; ऊस, केळी, नारळ पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 22:48 IST