लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : भारत सरकारच्या संघ लोकसेवा आयोगच्या (यूपीएससी) परीक्षेत तीन वेळच्या अपयशाने खचून न जाता संयम ठेवून अभ्यासातील सातत्याच्या बळावर नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील तुषार तानाजी गावडे याने बाजी मारली. भारतातील ३३० विध्यार्थ्यांत १५२ वा क्रमांक मिळवून असिस्टंट कमांडंट पदाचे यश मिळवले. तुषार हा पारगावातील पहिला यूपीएससीचा मानकरी ठरला आहे.
तुषार गावडेचे प्राथमिक शिक्षण नवे पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित पाराशर हायस्कूलमध्ये झाले. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन राहुरीच्या महात्मा फुले कृषी महाविद्यालयातून त्याने कृषी अभियांत्रिकी पदवी घेतली. पदवीनंतर दिल्ली येथील वाजीराम क्लासमध्ये सतत तीन वर्षे अभ्यास केला. पहिले दोन प्रयत्न अयशस्वी, तर तिसऱ्या वेळी मुलाखतीतून त्याला बाहेर पडावे लागले होते. सलग तीन वर्षे आलेल्या अपयशाने खचून न जाता त्याने चौथ्या प्रयत्नात दमदार यश मिळविले. लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये त्याने स्वतःच्या घरी राहून दहा तास अभ्यास करून हे लख यश मिळवले.
तुषारचे वडील पारगावच्या पाराशर टेक्निकल हायस्कूलमध्ये शिक्षक असून आई गृहिणी आहे. अपयशानंतर संयम ठेवून अभ्यासात ठेवलेले सातत्य व वडिलांचे पाठबळ या बळावर आपण यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया तुषारने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. यूपीएससीतील तुषारच्या यशाची बातमी गावात कळताच तुषारवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला आहे.
फोटो : तुषार गावडे