प्रकाश पाटील -कोपार्डे ... केंद्रीय नव आणि अक्षय मंत्रालयाने सोलर वॉटर हिटरवर देण्यात येणारे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. या निर्णयामुळे सोलर वॉटर हिटरच्या किमतीत मोठी वाढ होणार असून, नैसर्गिक ऊर्जा वापरणाऱ्या लोकांना याचा फटका बसणार आहे.देशात अक्षय ऊर्जा योजनेंतर्गत सोलर वॉटर हिटरवर देण्यात येणाऱ्या अनुदानामुळे दिवसेंदिवस याच्या खरेदीकडे लोकांचा मोठा कल वाढला आहे. शासनाचे मिळणारे अनुदान व स्वस्त व कायमस्वरूपी मिळणारा स्वच्छ सूर्यप्रकाश याचा विचार करून सोलर वॉटर हिटर हे फायद्याचेच ठरत असल्याने लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने सोलर वॉटर हिटरसाठी देशपातळीवर तीन हजार कोटींची सबसिडी सध्या केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांना देय आहे. यामुळे केंद्र शासनाने १९ सप्टेंबरला सोलर वॉटर हिटरवरील अनुदान देण्याचे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.गेली तीन वर्षे ‘जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन’ या कार्यक्रमांतर्गत सौर ऊर्जेवरील विविध उपकरणांवर अनुदान दिले जाते. सौरबंबांना ३० टक्के अनुदानाची तरतूद आहे. ग्राहकांना अनुदानाची रक्कम वजा करून सौरबंब उपलब्ध करून द्यावयाचा आणि नंतर शासनाकडून ही रक्कम मिळविण्याची जबाबदारी चॅनेल पार्टनर किंवा उत्पादकांवर असेल, अशी ही योजना होती. यामुळे ग्राहकाला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत नव्हत्या. यामुळे या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला.सोलर वॉटर हिटरचा प्रसार शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही झाला आहे. अनुदान रद्द केल्यानंतर स्पर्धात्मकता वाढून सौरबंबाच्या किमती कमी होतील, असे मत शासनाचे आहे. वॉटर हिटरच्या किमती वाढणारकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १०० लिटरच्या फ्लॅट प्लेट सौरबंबांची किंमत २२ हजार रुपये आहे. त्यातून ३० टक्के प्रमाणे ६ हजार ६०० रुपये अनुदानाची रक्कम वजा जाता ग्राहकाला १५ हजार ४०६ रुपये तो पडत असे, तर व्हॅक्युएटेड ट्युबलर कलेक्टर सोलरची किंमत २० हजार असून, ६ हजार अनुदान वजा जाता १४ हजारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध होत असे. १ आॅक्टोबरपासून हे अनुदान बंद होत असल्याने सोलर वॉटर हिटरच्या किमती ३० टक्क्यांनी वाढणार आहेत.
सौरबंबासाठीचे अनुदान बंद
By admin | Updated: October 17, 2014 22:59 IST