जयसिंगपूर : केंद्र सरकारने आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, योगा, युनानी अशा वैद्यकीय शाखांसाठी स्वतंत्र आयुष खाते निर्माण केले आहे. यासाठी आर्थिक तरतूदही वाढविली आहे. तसेच आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्टर्सना शासनसेवेत घेण्याचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाच्या विचाराधीन आहे, असे प्रतिपादन महिला आणि बाल कल्याण व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी केले.स्व. डॉ. जे.जे. मगदूम यांच्या ८५ व्या जयंतीनिमित्त येथील मोदी हॉस्पिटलमध्ये मोफत रोगनिदान, होमिओपॅथिक औषधोपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार उल्हास पाटील होते. यावेळी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा सुनीता खामकर, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदूम, उपाध्यक्षा सोनाली मगदूम, केंद्रीय होमिओपॅथिक परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे, महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक बाहुबली शहा, डॉ. कांचन देसरडा, डॉ. रवी भोसले, जयप्रकाश ठाकूर, बाबा देसाई, डॉ. शाम सुंगारे, डॉ. वाय. आर. पाटील, आदी उपस्थित होते.विद्या ठाकूर म्हणाल्या, एमबीबीएस, एमडी डॉक्टर शहरात जातात. यामुळे ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर मिळत नाहीत. म्हणूनच आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्टर्संना सेवेत घेण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. आमदार उल्हास पाटील म्हणाले, जे. जे. मगदूम ट्रस्टमुळे जयसिंगपूरमध्ये शिक्षणक्षेत्राचे आकर्षण निर्माण झाले. तसेच उद्योग, वैद्यकीय आणि शैक्षणिकक्षेत्रात जयसिंगूपरचे योगदान मोठे आहे. होमिओपॅथिक डॉक्टर्सना आता अॅलोपॅथिकची पॅ्रक्टिस करण्याची परवानगी मिळाली आहे, असे सांगून आमदार सुरेश हाळवणकर यांनी डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे विशेष कौतुक केले. यावेळी डॉ. बाहुबली शहा व डॉ. अरुण भस्मे यांनी मनोगत व्यक्त केले. ना. ठाकूर यांच्या हस्ते विजय मुळे यांचा सत्कार करण्यात आला. विजय मगदूम यांनी प्रास्ताविक केले.
होमिओपॅथिक डॉक्टर्सना सेवेत घेण्याचा प्रयत्न
By admin | Updated: December 31, 2014 23:57 IST