रत्नागिरी : यंदा जिल्ह्यात पाणीटंचाई कमी असली तरी टंचाईग्रस्त गावातील १० हजार ७८९ लोकांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. शासनाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. जिल्ह्यात अवेळी पडणारा पाऊस, गारा यामुळे गतवर्षीपेक्षा यंदा पाणीटंचाईचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. कडक उन्हामुळे अंगाची लाही होत असल्याने लोक हैराण झाले आहेत. त्यातच नाले, ओढे, विहिरी, विंधन विहिरी आटल्याने टंचाईग्रस्त गावांतील गुरेही पाण्यासाठी तडफडत आहेत. आज टंचाईग्रस्तांचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ४१ गावांतील ६७ वाड्यांमध्ये पाणीटंचाईचा उद्रेक झाला आहे. या टंचाईग्रस्तांना एक ते दोन दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गतवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये आजच्या दिवशी ६२ गावातील १३३ वाड्यांना २० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. डोंगरदर्यात वसलेल्या धनगरवाड्यांतील लोकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या वाड्या डोंगरदर्यामध्ये असल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे येथील विहिरी, विंधन विहिरी, ओढे, झरे आटल्याने रहिवाशांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे़ टंचाईग्रस्तांमधील अनेक वाड्यांमध्ये पाण्याचा टँकर नेताना चालकाला मोठी कसरत करावी लागते. टंचाईग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी अवेळी पडणार्या पावसाचा परिणाम म्हणून गतवर्षीपेक्षा ती कमीच आहे. कारण पावसाचे पाणी जमिनीत झिरपल्याने पाण्याची पातळी खालावत नाही. मात्र, ज्या गावातील वाड्यांमध्ये सध्या पाणीटंचाई सुरु आहे. त्या गावातील ग्रामस्थांची पाण्यासाठी तडफड सुरु आहे. त्यांना फक्त पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, इतर वापरासाठी लागणारे पाणी कुठून आणणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी टंचाईग्रस्त भागातील लोकांचे हाल होत आहेत, (शहर वार्ताहर)
११ हजार लोकांची पाण्यासाठी तडफड
By admin | Updated: May 8, 2014 15:16 IST