कोल्हापूर : निवृत्तिवेतनविषयक प्रलंबित लाभ पोलीस प्रशासनाकडून मिळत नसल्याच्या कारणातून सेवानिवृत्त सहायक फौजदाराने बुधवारी दुपारी पोलीस मुख्यालयात तासभर गोंधळ घातला. नवे पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे व तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची बैठक सुरू असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कांबळे यांची उचलबांगडी करत शाहूपुरी ठाण्यात आणून ठेवले. सहायक फौजदार कुंडलिक हरी कांबळे हे ३० जून २००७ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचे निवृत्तिवेतनविषयक सर्व लाभ त्यांना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत; परंतु आपणाला निवृत्तिवेतन कमी दराने मिळाल्याची तक्रार कांबळे यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे केली होती. त्यांनी कोषागार अधिकाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बैठक घेऊन कांबळे यांच्या निवृत्तिवेतन प्रकरणाची तपासणी केली असता निवृत्तिवेतन बरोबर असल्याचा कोषागार अधिकाऱ्यांनी निर्वाळा दिला; परंतु कांबळे यांचे समाधान झाले नाही. पानसरे हत्येच्या तपासासंदर्भात तत्कालीन पोलीस महासंचालक संजीव दयाल यांची बैठक सुरू असताना विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर कांबळे यांनी गोंधळ घातला होता. पोलीस अधीक्षक देशपांडे हे पदभार स्वीकारण्यासाठी सकाळी अकरा वाजता पोलीस मुख्यालयात आले. त्यांची डॉ. शर्मा यांच्याबरोबर बैठक सुरू असतानाच मुख्यालयात कांबळे आले. ते अधीक्षकांच्या कक्षामध्ये निघाले असताना पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी त्यांनी तासभर गोंधळ घातला.
मुख्यालयात सेवानिवृत्त सहायक फौजदाराचा गोंधळ
By admin | Updated: December 10, 2015 01:31 IST