हातकणंगले : खोची (ता. हातकणंगले) येथील खोची हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सहलीचा आयशर टेम्पो पलटी होऊन झालेल्या अपघातात २७ जण जखमी झाले आहेत. यातील सात विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. ही दुर्घटना आज, बुधवारी दुपारी रामलिंग (ता. हातकणंगले) येथे घडली. जखमींमध्ये दोन शिक्षकांसह २५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. खोची येथील खोची हायस्कूलचे सुमारे ९० विद्यार्थी व शिक्षक आयशर टेम्पो (एमएच ४३ इ २९७३) ने हातकणंगले तालुक्यातील रामलिंग तीर्थक्षेत्रावर सहलीसाठी आले होते. रामलिंग तीर्थक्षेत्र डोंगराच्या कुशीत वसले असून तेथे तीव्र उताराचा रस्ता आहे. दुपारी परत येताना तीव्र उतारावर गाडीचा वेग न आवरल्याने टेम्पो तीव्र उतारावरून खाली पडून पलटी झाला. टेम्पो मध्येच असलेल्या झाडाला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला.या अपघातात एकूण २७ जण जखमी झाले असून, जखमींमध्ये दोन शिक्षकांचाही समावेश आहे. अपघातानंतर तत्काळ शासकीय रुग्णवाहिका व स्वप्निल नरुटे या युवकांनी स्वत:च्या रुग्णवाहिकेतून जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यापैकी २० जण किरकोळ ) जखमी असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. योगेश सुनील हुंगने (वय १५, रा. भेंडवडे), सम्मेद धोंडू डांगे (१०, रा. दूधगाव), सौरभ विनोद कांबळे (१३, रा. बुवाचे वठार), निखिल हणमंत चव्हाण (१६, रा. भेंडवडे), अनिकेत मोहन चौगुले (१५, रा. बु. वाठार), ऋषिकेष सदाशिव कोळी (१४, रा. भेंडवडे), ऋतुराज विलास पाटील (१२, रा. खोची) अशी या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांना उपचारार्थ वडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, राजूबाबा आवळे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. अपघाताची वर्दी राजेंद्र धुळा गुरव (रा. आळते) यांनी हातकणंगले पोलिसांत दिली असून, घटनेची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे. टेम्पो चालक अरुण सुकुमार गुजर (रा. दुधगाव, ता. मिरज) याला पोलिसांनी अटक केली आहे.
सहलीच्या टेम्पोला अपघात; २७ जखमी
By admin | Updated: August 21, 2014 00:51 IST