कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई आणि त्र्यंबोली देवी या सखींच्या भेटीच्या रविवारी (दि. १८) होणाऱ्या कोहाळपंचमी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. कोहळा फोडण्याचा विधी केला जातो, त्या सभामंडपाच्या स्लॅबच्या फळ्यांचे काम पूर्ण झाल्याने त्या शुक्रवारी काढण्यात आल्या आहेत; तर रविवारसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात ललितापंचमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. यादिवशी अंबाबाई आपल्या लव्याजम्यानिशी प्रिय सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीसाठी जाते. तसेच जुना राजवाड्यातून देवी तुळजाभवानी व गुरुमहाराजांच्या पालख्याही असतात. दुपारी बारा वाजता गुरव घराण्यातील कुमारिकेचे पूजन आणि छत्रपतींच्या हस्ते कोहळा फोडण्याचा विधी होतो. यंदा शनिवारी (दि. १७) दुपारनंतर ललितापंचमी सुरू होणार असल्याने रविवारी हा सोहळा होणार आहे. रविवारी पहाटे पाच वाजल्यापासून ते त्र्यंबोली यात्रा संपेपर्यंत श्री त्र्यंबोलीदेवी मंदिराकडे जाणारा टेलिफोन टॉवर ते त्र्यंबोलीदेवी मंदिर गेट, आर्मी आॅफिसर्स क्वार्टर्स ते विक्रमनगर पाण्याची टाकी या परिसरातील रस्त्यांवरून सर्व वाहनांना प्रवेश बंद आहे. ताराराणी चौक ते टेंबलाई रेल्वे फाटकमार्गे जाणारी अवजड वाहने ताराराणी चौकातून शिरोली जकात नाका, तावडे हॉटेल मार्गावरून जातील. टाकाळा सिग्नल चौक ते त्र्यंबोली मंदिराकडे जाणारी अवजड वाहने टाकाळा चौकातून वि. स. खांडेकर मार्गावरून राजारामपुरी रोडने सायबर कॉलेज, शिवाजी विद्यापीठमार्गे मार्गस्थ होतील. उचगाव फाट्याकडून कोल्हापुरात येणारी वाहने उचगाव फाट्यातून सरनोबतवाडी मार्गे किंवा तावडे हॉटेलमार्गे किंवा शाहू टोलनाक्यामार्गे हायवे कँटीन चौक, सायबर कॉलेज यामार्गे येतील. त्र्यंबोली यात्रेच्या के.एम.टी. बसेस टाकाळा सिग्नल चौक, पुढे शिवाजी विद्यापीठ हायवे कॅँटीनमार्गे शहरात जातील.
कोहाळपंचमीनिमित्त त्र्यंबोली मंदिर गजबजले
By admin | Updated: October 16, 2015 23:10 IST