कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पूर्णपणे कमी झाला असला, तरी गेल्या अकरा महिन्यांत बाधित रुग्णांच्या संख्येने ५० हजारांचा टप्पा पूर्ण केला आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होत असताना, दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लस आल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून धुमाकूळ माजविणाऱ्या या संसर्गाची भीती मात्र पूर्णपणे गेली आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचे १३१ रुग्ण उपचार घेत आहेत.
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात केवळ सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील चार हे कोल्हापूर शहरातील आहेत. सुदैवाने शनिवारी एकही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ५० हजार ०८७ इतकी असून, १७२९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
कोरोनाची स्थिती सामान्य झाल्यामुळे तसेच लसीकरण सुरू झाल्यामुळे या रोगाविषयी असणारी भीती कमी झाली आहे. ग्रामीण भागात मास्क, सामाजिक अंतर याचे भान कोणाला राहिलेले नाही. शहरात सामाजिक अंतर पाळले जात नसले, तरी ऐशी टक्के लोक मास्कचा वापर करताना दिसतात.