मोहन सातपुते - उचगाव -- पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गालगतच्या गांधीनगर, तावडे हॉटेल, उचगाव फाटा, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, मयूर पेट्रोल पंप, गोकुळ शिरगाव ब्रिज, लक्ष्मी टेकडी, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे वळणाऱ्या या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्याने राष्ट्रीय महामार्गालगतच्या या गावांना अपघाताची झळ सोसावी लागत आहे. यामुळे महामार्गाजवळ असणाऱ्या नऊ गावांना हा मृत्यूचा सापळा ठरतो आहे.या महामार्गावर स्पीड ब्रेकर नाहीत, रस्ता ओलांडण्याकरिता झेब्रा क्रॉसिंग नाही किंवा भुयारी मार्ग नाहीत. तसेच पुढे गाव आहे, असा फलक देखील नाही. त्यामुळे सुसाट वेगाने येणारी वाहने धोकादायक ठरत आहेत.या महामार्गावर दररोज पाच ते सहा अपघात होत आहेत. या अपघातांची कारणेही वेगवेगळी आहेत. चालकाला लागलेली डुलकी, वाहनांवर नियंत्रण नसणे, ओव्हरटेक, मद्यपान, वळणाचा अंदाज न येणे, ईर्ष्या, वाहनांमधील कर्णकर्कश गाण्याचा आवाज, पाठीमागील वाहनांकडे दुर्लक्ष, वाहनांमध्ये फोनवर बोलणे, तर अवजड वाहनांमध्ये प्रवासी घेऊन वाहतूक करणे, दुचाकी चालकांचे हेडफोन्स आणि वाहनांवर वेग नियंत्रण नसणे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राज्यात २०१३ मध्ये ११ हजार ७ मोठे अपघात झाले, तर १२ हजार १९४ जणांना रस्ते अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. खेड्यापाड्यांतून आलेल्या वाहनधारकांना महामार्गावरील वाहनांचा अंदाज येत नसल्याने सुसाट वेगाने धावणाऱ्या या वाहनधारकांना आपल्या वाहनाची ना घरच्या लोकांची काळजी, यामुळे रस्ते अपघातांमध्ये वाहनांसह मनुष्यहानी ही चिंतेची बाब झाली आहे. महामार्ग पोलीस रस्त्यावर पेट्रोलिंग करीत असले, तरी वाहनधारक त्यांनाही ओव्हरटेक करीत आहेत. कागलकडून येणारी वाहने गोकुळ शिरगाव गावाजवळ मोठ्या प्रमाणात अपघात घडवीत आहेत. उजळाईवाडी, सायबरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत अपघात घडतात. मयूर पेट्रोल पंपाशेजारी चित्रनगरीकडे जाताना अपघात होतात. सरनोबतवाडी, शिवाजी विद्यापीठाकडे वळताना अपघात होतात. तावडे हॉटेलकडे वळताना व उचगावकडे जाताना अपघात होतात.
महामार्गालगतच्या गावांना अपघाताची झळ
By admin | Updated: August 9, 2014 00:32 IST