परभणी: परभणी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र अधिकारी आणि केंद्र अध्यक्षांचे दुसरे प्रशिक्षण ५ आॅक्टोबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले. यावेळी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रियेसाठी सुमारे साडेपाच हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण रविवारी पार पडले. परभणी, गंगाखेड, पाथरी आणि सेलू या चारही मतदार संघात त्या त्या ठिकाणी हे प्रशिक्षण घेण्यात आले. परभणी येथे कृषी महाविद्यालयात हे प्रशिक्षण पार पडले. मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी, मतदान अधिकारी आणि मतदान केंद्राध्यक्ष यांची कर्तव्ये आदी विषयीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. याप्रसंगी परभणी मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष शिंदे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, जिल्हाधिकारी सिंह यांनी जिल्ह्यातील अन्य मतदार संघातील प्रशिक्षणासही भेट दिली.दरम्यान, पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या जिल्ह्यातील सहा कर्मचाऱ्यांना निवडणूक विभागाने नोटिसा बजावल्या होत्या. या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रशिक्षणास उपस्थित राहून खुलासा सादर करणे बंधनकारक केले होेते. आज पार पडलेल्या प्रशिक्षणानंतर लगेच प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामुळे किती कर्मचारी या बैठकीस उपस्थित राहिले आणि किती कर्मचाऱ्यांनी खुलासे सादर केले, या विषयीची माहिती मिळू शकली नाही.(प्रतिनिधी)
ईव्हीएम मशीन संदर्भात प्रशिक्षण
By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST