इचलकरंजी : लालनगरमधील झोपडपट्टीवासीयांना पुनर्वसन योजनेत घरकुले बांधून द्यावीत, सध्याच्या घरकुलांना घरफाळा लागू करावा, अशा प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी महिला-पुरुष नागरिकांनी नगरपालिकेवर मोर्चा काढला. नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना घेराव घालून विविध प्रश्न विचारून भंडावून सोडले.लालनगरमध्ये सुमारे ४२५ झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. त्यांना शासनाच्या पुनर्वसन योजनेतून घरकुले मिळावीत. सन २०११ मध्ये पालिकेच्या सभेत झालेल्या ठरावानुसार लालनगरमधील झोपडपट्टीधारकांना भुईभाडे व घरफाळा लागू करावा. झोपडपट्टीतील रस्त्यांचे डांबरीकरण, पुरुषांसाठी शौचालय, परिसराची स्वच्छता, आदी मागण्यांसाठी शुक्रवारचा मोर्चा आयोजित केला होता. मोर्चा पालिकेवर आल्यानंतर विनोद आवळे, सुनीता जाधव, आदींचे एक शिष्टमंडळ नगराध्यक्षा बिरंजे यांना भेटले. शिष्टमंडळातील महिला-पुरुष आंदोलनकर्त्यांनी त्यांना घेराव घातला.यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार, ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव, पाणीपुरवठा सभापती रवी रजपुते, नगरअभियंता भाऊसाहेब पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, आदी उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळातील आंदोलनकर्त्यांनी अनेक प्रश्न विचारून नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, पक्षप्रतोद जाधव, सभापती रजपुते यांना भंडावून सोडले. अखेर लालनगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून तेथे नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांचे आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)
नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By admin | Updated: October 16, 2015 22:27 IST