शिरोली : सांगली फाटा ते बसवान्ना खिंड या २० कि. मी. रस्त्याचे चौपदरीकरण ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सुप्रीम कंपनीला दिले. तसेच कोल्हापूर-सांगली रस्ता टोलमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, त्याबाबत अभ्यास सुरू आहे, असेही सूतोवाच मंत्री पाटील यांनी केले. ते शासकीय विश्रामगृहात झालेल्या रस्त्याच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. कोल्हापूर-सांगली रस्त्याचे गेल्या दोन वर्षांपासून काम सुरू आहे. ३१ आॅक्टोबरला कामाची मुदतही संपली आहे. पण, अद्याप ४० टक्केच काम झाले आहे. काही तांत्रिक बाबींमुळे कामास विलंब झाला आहे, पण सध्या काम गतीने सुरू असून, ३१ मार्च २०१५ पर्यंत शिरोली-सांगली फाटा ते बसवान्ना खिंड या २० कि.मी.चे काम कंपनीने तत्काळ पूर्ण करावे, तसेच बसवान्ना खिंड ते सांगली या मार्गावरील भूसंपादन पूर्ण झाल्यावर ३१ मे २०१५ पर्यंत बसवान्ना खिंड ते जयसिंगपूर आणि बसवान्ना खिंड ते सांगली असे दोन्हीकडील दुपदरीचे काम कंपनीने पूर्ण करावे. तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब भूसंपादनातील त्रूटी दूर करून रस्त्यासाठी जमिनी लवकर कंपनीला द्याव्यात, असेही मंत्री पाटील म्हणाले. हातकणंगले येथील उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली असून, उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासही कंपनीला सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाची रक्कम २०८ कोटी इतकी असून, ही रक्कम फार मोठी नसून, रक्कम परत देण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास सुरू असून, त्यामुळे लवकरच काहीतरी पर्याय मिळेल. त्यामुळे ही रक्कम लोकांवर लादण्यापेक्षा कंपनीला परत कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच रस्त्याची १९६ कोटींची कामे पूर्ण झाल्यावर लगेचच टोल चालू करण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असेही मंत्री पाटील म्हणाले. बैठकीस आमदार सुजित मिणचेकर, ‘सुप्रीम’चे अशोक मोहिते, सागर जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एन. एम. वेदपाठक, ए. एस. डफळे उपस्थित होते.
सांगली-कोल्हापूर रस्ता टोलमुक्तीसाठी प्रयत्न
By admin | Updated: February 8, 2015 01:07 IST